खड्ड्यांच्या विळख्यात तळेगाव; आश्वासनांच्या धुळीत रस्त्यांची दयनीय कहाणी
खड्ड्यांच्या विळख्यात तळेगाव; आश्वासनांच्या धुळीत रस्त्यांची दयनीय कहाणी
तळेगाव दाभाडे : गावभागातील नालबंद गल्ली (शितळा देवी मंदिर परिसर) ते आझाद मित्र मंडळ मार्गे कचरा डेपोपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. भोई आळी परिसरातील रस्त्यांचीही परिस्थिती याच धर्तीवर असून खड्डे, उखडलेला डांबर थर आणि उघडी गटारे यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.
या मार्गावरून पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढला असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कचरा डेपोकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने दिवसभर कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू असते. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे या गाड्यांमधील कचरा सांडून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. अस्वच्छतेमुळे डास व माशांची उत्पत्ती वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, २००८ नंतर या रस्त्यांची कोणतीही मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गटारे उघडी पडल्याने आणि रस्त्यांची पातळी खालावल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी गुढी पाडव्यापर्यंत रस्त्यांचे मजबूत व पक्के डांबरीकरण तसेच बंदिस्त गटार व्यवस्था उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली. गुढी पाडव्याची मुदत उलटूनही कामास सुरुवात नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असून केवळ दिखावू आश्वासनांनी जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे.





