मावळच्या विकासावर अवैध धंद्यांची सावली कायम :अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ?
मावळच्या विकासावर अवैध धंद्यांची सावली कायम :अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ?
मावळ :
औद्योगिक प्रगती, पर्यटनवाढ आणि शैक्षणिक विस्तारामुळे झपाट्याने बदलणाऱ्या मावळ तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः मुळं घट्ट रोवली आहेत. मुंबई–पुणे महामार्गाच्या सान्निध्यामुळे आणि वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर येथे कायद्याच्या चौकटीबाहेर सुरू असलेल्या व्यवसायाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या सर्व प्रकारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष की संगनमत, असा प्रश्न नागरिकांना सतावू लागला आहे.
महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स, ढाबे, बार तसेच आडमार्गाने सुरू असलेल्या ठिकाणी बेकायदेशीर दारूविक्रीचा व्यवसाय तेजीत असल्याची चर्चा आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अपेक्षित ती दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे कारवाईचा बोजवारा उडाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये बळावत आहे.
तालुक्यात एका बाजूला एमआयडीसी क्षेत्राचा विस्तार, मोठ्या प्रकल्पांची उभारणी आणि गुंतवणुकीची लाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांचे जाळे अधिकच मजबूत होत आहे. विकासाच्या आडून वाढणाऱ्या या गैरप्रकारांमुळे मावळच्या प्रतिमेला तडा जात असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डान्सबार, हातभट्टी, जुगार अड्डे, अवैध वेश्या व्यवसाय यांसह अमली पदार्थांची विक्री हा गंभीर मुद्दा बनला आहे. एमडी पावडर, गांजा, केटामाइन, नशेच्या गोळ्या आणि अफू यांसारख्या घातक पदार्थांची विक्री काही भागांत उघडपणे होत असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व प्रकारांना कोणाचा आश्रय आहे, हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.
मावळ तालुका शिक्षणासाठी उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येत असताना राज्यासह परराज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येथे दाखल होत आहेत. अशा वेळी वाढते अवैध धंदे आणि सहज उपलब्ध होणारे अमली पदार्थ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालणारे ठरत आहेत. पालकांमध्येही यामुळे चिंता वाढीस लागली आहे.
ग्रामीण भागही या विळख्यातून सुटलेला नाही. लोणावळा–खंडाळा पर्यटन पट्टा, एमआयडीसी परिसर, वडगाव, तळेगाव, कामशेत, सोमाटणे, व ग्रामीण भागांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे पसरल्याचे चित्र आहे. विशेषतः युवक वर्ग या प्रवाहात ओढला जात असल्याने सामाजिक स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी केवळ दिखाऊ कारवायांवर न थांबता कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा मावळचा विकास आणि प्रगती यावर अवैध धंद्यांची सावली कायम राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.





