राजेंद्र काळोखे यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता, कबड्डी क्षेत्रावर शोककळा
राजेंद्र काळोखे यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता, कबड्डी क्षेत्रावर शोककळा
आठवडाभरापूर्वीच सल्लागारपदी निवड जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच काळाचा घाला
देहू : तीर्थक्षेत्र देहू नगरीतील ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र स्पोर्ट्स कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई अंतर्गत कार्यरत पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित सल्लागार कै. राजेंद्र दगडूजी काळोखे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
कै. काळोखे यांची अवघ्या आठवडाभरापूर्वीच पत्रकार संघटनेच्या सल्लागारपदी निवड झाली होती. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि मार्गदर्शनाचा संघटनेला मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
देहू परिसरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने वाचा फोडली. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी पत्रकार म्हणून प्रभावी भूमिका बजावली.
पत्रकारितेसोबतच कबड्डी क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. महाराष्ट्र स्पोर्ट्स कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी कबड्डीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच विविध क्रीडा उपक्रमांना त्यांनी पाठबळ दिले.
नव्या सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारून पत्रकारांच्या हितासाठी काम करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने पत्रकार संघटनेत हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू स्वभाव आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.
आज रात्री अंत्यसंस्कार
कै. राजेंद्र काळोखे यांच्या पार्थिवावर आज रात्री 8:30 वाजता श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीकाठी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात भाऊ गजानन दगडूजी काळोखे, पत्नी सारिका राजेंद्र काळोखे आणि मुलगा प्रतीक राजेंद्र काळोखे असा परिवार आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबईसह पत्रकारिता, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व मित्रपरिवाराने कै. काळोखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रातील अनुभवी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.





