महत्त्वाचे

वडगाव पंचायत समितीत भोंगळ कारभार; अधिकारी गायब :जनता संतप्त.


वडगाव पंचायत समितीत भोंगळ कारभार; अधिकारी गायब :जनता संतप्त.

वडगाव : मावळ तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी (दि. १६ एप्रिल) अक्षरशः कारभार ठप्प झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. कार्यालयीन वेळेत एकाही जबाबदार अधिकाऱ्याची उपस्थिती नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्यांना मात्र रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली.

आठवडी बाजाराचा दिवस असल्याने आंदर मावळसारख्या दुर्गम भागातून नागरिक मोठ्या अपेक्षेने पंचायत समितीकडे धाव घेतात. मात्र, याच दिवशी तालुक्याचे गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान यांच्यासह विस्तार अधिकाऱ्यांनीही दांडी मारल्याचे स्पष्ट झाले. कार्यालयात शिपाईसुद्धा हजर नसल्याने संपूर्ण इमारत ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रकाराची माहिती मिळताच माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय काजळे यांनी माध्यमांसह पंचायत समिती गाठली. त्यांनी प्रत्येक विभागाची पाहणी करत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड केला. जनतेची कामे रखडवून अधिकारी गायब राहणे, ही गंभीर बाब असून संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,असा इशारा काजळे यांनी दिला.

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांना जनतेची कामे प्रामाणिकपणे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे सरळ दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पंचायत समितीचे सभापती व उपसभापतीही अनुपस्थित असल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे शासन जनतेसाठी विविध योजना राबवत असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवरच असा ढिसाळ कारभार होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *