सामाजिक

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग


कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

कामशेत : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ आणि लायन्स क्लब ऑफ कामशेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवशंकर गार्डन मंगल कार्यालय, कामशेत येथे झालेल्या या शिबिरात शहरातील सहा शाळांमधील तब्बल १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
“आपला बाप्पा आपणच बनवूया, पर्यावरण वाचवूया!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. प्रसिद्ध मूर्तिकार अतिष थोरात यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीची विविध तंत्रे समजावून सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद घेतला.
शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढवून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण रोखणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य आयोजकांकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वजीत बेडगे,ज्ञानेश्वर गायकवाड,दिपाली ठोबरे, सीमा गुंजाळ

 

प्रताप गुंजाळ, मोहन वाघमारे, राजू अग्रवाल , बाळासाहेब जमादार, केदार डाखवे आणि सीमा देव उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना चेतन वाघमारे यांनी केली. सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले, तर आभार प्रदर्शन केदार डाखवे यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहा शाळांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे शिबिराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *