आठ वर्षांचा वनवास संपला; गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आई एकवीरेचा कळस पुनःस्थापित!
आठ वर्षांचा वनवास संपला; गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आई एकवीरेचा कळस पुनःस्थापित!
लोणावळा : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या अढळ श्रद्धेचे केंद्र असलेल्या आई एकवीरा देवी मंदिर येथे तब्बल आठ वर्षांनंतर एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मंदिराचा चोरीला गेलेला कळस गुढीपाडव्याच्या मंगलप्रसंगी, गुरुवारी (१९ मार्च २०२६) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा देवस्थानात दाखल झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे नवचैतन्य संचारले आहे.
सुमारे आठ वर्षांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा कळस लंपास केला होता. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त झाली होती. पोलिसांनी तत्पर तपास करत हा कळस हस्तगत करण्यात यश मिळवले; मात्र न्यायालयीन प्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे तो दीर्घकाळ पोलीस कस्टडीतच अडकून राहिला. श्रद्धेचा हा मानबिंदू परत मिळवण्यासाठी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती हुलावळे आणि विश्वस्त मंडळाच्या चिकाटीला अखेर यश मिळाले. सर्व कायदेशीर अडथळे पार करून कळस देवस्थानाच्या स्वाधीन करण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या उपस्थितीत विधिवत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती आण्णा देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, खजिनदार संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, सहसचिव महेंद्र देशमुख, संदीप देवकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुढीपाडव्याच्या मंगल क्षणी कळसाचे पुनरागमन झाल्याने भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. आठ वर्षांची प्रतीक्षा संपली, अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली. यंदाचा गुढीपाडवा भक्तांसाठी खऱ्या अर्थाने ‘सोन्याचा दिवस’ ठरला असून, मंदिर परिसरात भक्ती, आनंद आणि समाधानाचे वातावरण नांदताना दिसत आहे.





