शनिवार १२ सप्टेंबरला तळेगाव दाभाडे शहरात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व संस्कार वर्गा चा शुभारंभ
शनिवार१२ सप्टेंबरला तळेगाव दाभाडे शहरात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व संस्कार वर्गा चा शुभारंभ
तळेगाव दाभाडे : चला देश घडवूया, सुरुवात तळेगाव दाभाडे शहरा पासून करूया या ध्येयविचाराला कृतीची जोड देत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व संस्कार वर्ग या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर येथे सकाळी ९.३० वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनील शेळके तसेच माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. शिवराज पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील संधी, अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येय निश्चिती याबाबत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यासाची शिस्त, स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर संस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने तळेगाव दाभाडे व परिसरातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच सहाय्यक शिक्षकांनी उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे परिसरातून गुणवंत, शिस्तप्रिय, संस्कारक्षम आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन असलेली नवी पिढी घडविण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे. शिक्षणासोबत संस्कार आणि स्पर्धात्मक तयारी यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे.




