कॉपर चोरांच्या टोळीवर गुन्हे शाखा युनिट ४चा घणाघात; १९ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कॉपर चोरांच्या टोळीवर गुन्हे शाखा युनिट ४चा घणाघात; १९ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड : शहरातील डी.पी.मधील कॉपरच्या तारा व केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ने पर्दाफाश केला. या कारवाईत सहा संशयितांना ताब्यात घेत १८ लाख ७४ हजार रुपयांचे कॉपर, चारचाकी वाहन, आयसर वाहन व चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच देहूरोड परिसरातील गुन्ह्याच्या तपासात आणखी एका आरोपीकडून १ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ९ गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल १९ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर व पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना कॉपर चोरीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सहा संशयितांना वाहनांसह ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये जयराम विक्रम साळंके (२९), सूरज जालिंदर फड (२१), सचिन जालिंदर फड (२६), मोहम्मद रियाज मोहम्मद बशीर सलमानी, मनोज संतोषी चौधरी आणि अनुकुमार रामकृपाल गौतम यांचा समावेश आहे. तपासात आरोपींनी तळेगाव एमआयडीसी व चिखली परिसरातील विविध ठिकाणांहून डी.पी.मधील कॉपरच्या तारा व केबल चोरी केल्याची माहिती समोर आली.
या तपासातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहा आणि चिखली पोलीस ठाण्यातील दोन, असे आठ गुन्हे उघडकीस आले.
दरम्यान, देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३०२/२०२६चा समांतर तपास करताना घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या आधारे अजय प्रल्हाद गायकवाड (५०, रा. माधवनगर, चिखली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख १० हजार ५०० रुपयांची केबल वायर, दोन ग्राइंडर मशीन, दोन रेग्युलेटर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर, तसेच वायभसे, मोरे, महाडीक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, मेरगळ, वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, खराडे, माटे, नागरे, सोनवणे आणि बाळसराफ यांनी सहभाग घेतला.
तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माळी, ननावरे आणि कारके यांनी तांत्रिक तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे कॉपर चोरी करणाऱ्या टोळीला मोठा दणका बसला असून, चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





