क्राईम

सुसाईड पॉईंटची छाया गडद पर्यटननगरी लोणावळ्यात आत्महत्यांची मालिका


सुसाईड पॉईंटची छाया गडद
पर्यटननगरी लोणावळ्यात आत्महत्यांची मालिका

लोनावळा:
पर्यटनासाठी देशभर प्रसिद्ध असलेले लोणावळा सध्या आत्महत्यांच्या मालिकेमुळे हादरले आहे. निसर्गरम्य दऱ्या-खोऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटननगरीवर आता सुसाईड पॉईंट ची काळी छाया गडद होत चालली आहे. अवघ्या काही दिवसांत दोन धक्कादायक घटनांनी स्थानिकांसह पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

पुण्यातील विरेंद्र सिन्हा (वय ३२) या आयटी अभियंत्याने गुरुवारी (१२ फेब्रुवारी) पहाटे लायन्स पॉईंट येथून तब्बल २५० फूट खोल दरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली. बाणेर येथील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विरेंद्र यांची चारचाकी गाडी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान आत्महत्येपूर्वी पत्नी व मित्रांना ई-मेल व संदेश पाठविल्याचे उघड झाले. आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांसह शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम राबवली. गाडी उभी असलेल्या ठिकाणासमोरील दरीत विरेंद्र यांचा मृतदेह आढळला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास जीवाची पर्वा न करता रेस्क्यू टीम व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी मृतदेह बाहेर काढला.

याआधी मुंबईतील श्रेया नरेंद्र पाटील (वय २०) या कायद्याच्या विद्यार्थिनीने टायगर पॉईंट वरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्या घटनेचा धुरळा बसत नाही तोच विरेंद्र यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

  • लोणावळ्यातील रमणीय दऱ्या आता मृत्यूच्या दरीत परिवर्तित होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या कठोर उपाययोजना, सीसीटीव्ही यंत्रणा, संरक्षक जाळ्या आणि मानसोपचार सल्ला केंद्र उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा पर्यटननगर ची ओळख कायमची सुसाईड पॉईंट म्हणूनच ठसण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *