बंद गाळ्यात ऑनलाईन जुगाराचा अड्डा; सोमाटणेत चौघांवर पोलिसांचा छापा
बंद गाळ्यात ऑनलाईन जुगाराचा अड्डा; सोमाटणेत चौघांवर पोलिसांचा छापा
सोमाटणे :
सोमाटणे गावच्या हद्दीत शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या एका बंद गाळ्यात ऑनलाईन जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (दि. १२) सायंकाळी अचानक छापा टाकून चौघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, संगणक व इतर मुद्देमाल असा एकूण ५२ हजार ३५५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मयुर विलास जगदाळे यांनी फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे गावातील शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या एका गाळ्यात काही इसम ऑनलाईन जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी संगणकाच्या साहाय्याने ‘फन टु प्ले’ या ऑनलाईन जुगार अॅपवर पैशांची देवाणघेवाण करत जुगार खेळत व खेळवत असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत विक्रांत यशवंत गडकरी (वय ३५, रा. खळदेआळी, तळेगाव दाभाडे), अंकुश भिमराव पवार (वय ३४, रा. रमाकांतनगर, तळेगाव दाभाडे), सचिन भाउराम मेश्राम (वय ४०, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ) आणि सोमनाथ पंढरीनाथ मुहे (वय ३८, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.
छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, संगणक, मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५२ हजार ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बंद खोलीत सुरू असलेला हा ऑनलाईन जुगाराचा प्रकार परिसरातील तरुणांसाठी धोकादायक ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मयुर जगदाळे हे करीत असून परिसरात अशा बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.





