सामाजिक

जिजामाता चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक आदर्श:सनई-चौघड्याच्या मंगलधूनित सर्जा-राजा च्या साथीने गणरायाचे आगमन


जिजामाता चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक आदर्श:सनई-चौघड्याच्या मंगलधूनित सर्जा-राजा च्या साथीने गणरायाचे आगमन

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सव म्हटले की कानठळ्या बसविणारा साऊंड, रोषणाई आणि दिखाव्याची स्पर्धा असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, तळेगाव दाभाडे शहरातील जिजामाता चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या रूढीला फाटा देत पारंपरिकता आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत गणरायाचे उत्साहात स्वागत केले.

मंडळाने ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या साऊंड गोगाटाला नाकारून सनई-चौघड्याच्या मंगलमय स्वरांना पसंती दिली. पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी परिसर भारावून गेला. विशेष म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळत, वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या सर्जा-राजाला मंडळाने गणरायाच्या आगमनाची मानाची साथ दिली.

बैलगाडीला केळीची खुंटे, नारळाच्या झावळ्या आदी नैसर्गिक साहित्याची सजावट करून पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गोंगाटाऐवजी सनई-चौघड्याच्या सुरांनी आणि सर्जा-राजाच्या दिमाखदार उपस्थितीने मिरवणुकीला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले.

ही अनोखी आणि संस्कृतीची जपणूक करणारी मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मंडळाचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासह आपल्या मातीतल्या परंपरेची आठवण करून देणारा ठरला.

मंडळाचे अध्यक्ष पै. आदित्य म्हाळसकर, खजिनदार पै. अनिकेत काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *