महत्त्वाचे

वाडिवळे-खांडशी मार्गावर संथगतीचा अडथळा; धुळ, खड्डे आणि घसरड्या रस्त्याने नागरिक हैराण


वाडिवळे-खांडशी मार्गावर संथगतीचा अडथळा; धुळ, खड्डे आणि घसरड्या रस्त्याने नागरिक हैराण

कामशेत : मावळ तालुक्यातील वाडिवळे ते खांडशी या मुख्य मार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा वेग मंदावल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शहराशी संपर्क साधणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचा जीव अक्षरशः धोक्यात आला असून प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी आणि उंबरवाडी या गावांतील नागरिकांसाठी हा मार्ग जीवनवाहिनी ठरतो. दुधव्यवसायिक, कामगार, विद्यार्थी तसेच बाजारहाटासाठी जाणारे महिला व युवक-युवती रोज या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच असून संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे.

सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असून खडीचे ढिगारे विखुरलेले दिसतात. काही भागांत टाकण्यात आलेल्या मुरूमामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दुचाकीस्वारांना खडीवरून घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर चारचाकी वाहनांच्या हालचालीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे मागील वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे कधी अपघात होईल याचा अंदाज लागत नाही. आमची ही ससेहोलपट कधी थांबणार? अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेकडे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली असून कामाचा वेग वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *