तळेगावात प्लास्टिक कचरा जाळणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई: २ हजारांचा दंड
तळेगावात प्लास्टिक कचरा जाळणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई: २ हजारांचा दंड
तळेगाव दाभाडे : शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नगरपरिषदेने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तळेगाव स्टेशन विभागातील मातोश्री स्टील अँड फर्निचर या व्यावसायिक आस्थापनाकडून रस्त्यावर कचरा टाकून तो प्लास्टिक कचरा अशोकाच्या झाडाच्या बुंध्याजवळ जाळत असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेत संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगरपरिषद प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकत संबंधित व्यावसायिकाला रंगेहाथ पकडले. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या या कृत्याबद्दल संबंधितांवर २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शहरात वाढत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
ही कारवाई मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) यांच्या आवाहनानुसार करण्यात आली. शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान दत्तात्रय ढवळे (स्वच्छता निरीक्षक, स्टेशन विभाग), राहुल आगळे (मुकादम), साजेद शेख, शुभम हेंद्रे आणि आदेश जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील काळात अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





