चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मंदिर चोरीतील आरोपी जेरबंद; तळेगाव एमआयडीसी तपास पथकाची धडाकेबाज कारवाई
चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मंदिर चोरीतील आरोपी जेरबंद; तळेगाव एमआयडीसी तपास पथकाची धडाकेबाज कारवाई
तळेगाव दाभाडे : कडजाई मंदिर, इंदोरी तसेच तुळजाभवानी मंदिर, तळेगाव दाभाडे येथील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित आणि तब्बल चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने अखेर थेरगाव परिसरातून जेरबंद केले. या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. गुन्हा रजिस्टर क्रमांक १६९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३(५) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे व फरारी असलेला राहुल शिवाजी राठोड (वय २४, रा. नखाते नगर, थेरगाव, ता. हवेली, जि. पुणे) याला थेरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान सदर आरोपीचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुट चोरीच्या गुन्ह्याशी तसेच दक्षिण माळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर चोरीच्या गुन्ह्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपीच्या अटकेनंतर या दोन्ही घटनांबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, सहाय्यक पोलीस फौजदार अनंत रावण, पोलीस शिपाई भिमराव खिलारे आणि पोलीस शिपाई विनायक शेरमाळे यांच्या तपास पथकाने केली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे महाळुंगे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.





