मावळात अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा धडाका; ९८० ग्रॅम अफिम जप्त, तरुण जेरबंद
मावळात अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा धडाका; ९८० ग्रॅम अफिम जप्त, तरुण जेरबंद
शिरगाव (मावळ) :
मावळ तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या प्रवाहावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. शिरगाव-परंदवडी परिसरात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत तब्बल ९८० ग्रॅम अफिम जप्त करण्यात आली असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारमूल्य सुमारे ७ लाख ८४ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एका संशयित व्यक्तीकडून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. मंगळवारी (दि. १७ मार्च) रोजी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई पार पडली.
शिरगाव-परंदवडी मार्गावर आलेल्या बसमधून उतरलेल्या संशयितावर पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली होती. त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ९८० ग्रॅम अफिम हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी रोहनलाल नारायणलाल जाट (वय २५, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी हा मावळ परिसरात अफिम विक्रीसाठी आला असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे व नितीन उंब्रजकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. सध्या आरोपीकडून अधिक सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करत भविष्यातही अशाच कठोर मोहिमा राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.





