क्राईम

सुन्धा ज्वेलर्स’कडून ४० हून अधिक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक; मालक फरार


सुन्धा ज्वेलर्स’कडून ४० हून अधिक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक; मालक फरार

देहूरोड : येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सुन्धा ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानाच्या मालकांनी तब्बल ४० हून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने घेऊन अचानक दुकान बंद करत पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोडमधील मेन बाजार, सुभाष चौक परिसरात सुन्धा ज्वेलर्स हे दुकान चालवले जात होते. या दुकानाचे मालक अंबालाल जिवाजी सोनी (वय ५६) आणि त्यांचा मुलगा रोहित अंबालाल सोनी (वय ३०, रा. विकासनगर, किवळे) यांनी १ जानेवारी २०२६ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले. दागिने दुरुस्तीसाठी तसेच नवीन दागिने तयार करून देण्याच्या नावाखाली त्यांनी अनेकांकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम स्वीकारली होती.

फिर्यादीसह सुमारे ४० नागरिकांनी मिळून एकूण २६ लाख ६० हजार १५० रुपये इतकी रोकड तसेच सुमारे ६५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने विश्वासाने सोनी पिता-पुत्र यांच्याकडे दिले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत दागिने तयार करून देण्याऐवजी किंवा दुरुस्त केलेले दागिने परत करण्याऐवजी आरोपींनी वेळकाढूपणा सुरू केला. ग्राहकांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दुकान बंद असल्याचे आढळून आले.

यानंतर संबंधितांनी चौकशी केली असता, सोनी पिता-पुत्रांनी दुकान कायमस्वरूपी बंद करून पळ काढल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला असून, काहींच्या आयुष्यभराच्या बचतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः लग्नसराई आणि इतर समारंभांसाठी दागिने दिलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे.

या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे देहूरोड परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, याच दुकानाशी संबंधित इतर पीडितांनीही पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले असून तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *