सामाजिक

मातृ–पितृ पूजनातून समाजसेवेचा संस्कार; टेकवडे कुटुंबाचा प्रेरणादायी वारसा


मातृ–पितृ पूजनातून समाजसेवेचा संस्कार; टेकवडे कुटुंबाचा प्रेरणादायी वारसा

तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे सौ. प्रफुल्लता ज्ञानेश्वर टेकवडे (वय ७५) व श्री. ज्ञानेश्वर एकनाथ टेकवडे (वय ८४) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मातृ–पितृ पूजन सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता समाज, संस्कृती व पर्यावरण संवर्धनाची व्यापक जाणीव निर्माण करणारा प्रेरणादायी उत्सव ठरला. कुटुंबपूजनातून समाजपूजनाकडे जाणारा मूल्याधारित प्रवास या कार्यक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.

या प्रसंगी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सचिन ज्ञानेश्वर टेकवडे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्याचा गौरवपूर्ण आढावा सादर केला. लोहगड–विसापूर किल्ल्याच्या जतन व विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न, लोकसहभागातून राबवलेली कामे आणि आर्थिक योगदान यामुळेच लोहगड किल्ल्याला जागतिक पातळीवर युनेस्कोच्या यादीत स्थान मिळण्याच्या प्रक्रियेला मोठे बळ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

इतिहास व संस्कृतीप्रती असलेली त्यांची बांधिलकी ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक नाट्यप्रयोगातून मिळालेल्या निधीतून ग्रामदैवत श्री. डोळसनाथ महाराज यांना चांदीचे दागिने अर्पण करून त्यांनी जपल्याचे उपस्थितांनी नमूद केले. हा उपक्रम सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा आदर्श ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

औद्योगिक क्षेत्रातही समाजभान जपत, टाटा मोटर्स कंपनीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून पतपेढीच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक सहकार्य, अडचणीच्या काळात तत्काळ मदत, तसेच योग्य मार्गदर्शन देण्याचे कार्य त्यांनी निष्ठेने केले आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभले असल्याचा उल्लेख करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक संघ स्वयंसेवक म्हणून सेवा, शिस्त, राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी या मूल्यांशी प्रामाणिक राहत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वच मान्यवरांनी विशेष प्रशंसा केली. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांसाठी लोहगड–विसापूर मंच (₹११,०००), तेली समाज मारुती मंदिर (₹२५,०००) आणि देहू गावातील वृक्ष संवर्धन उपक्रम (₹३९,०००) अशी एकूण ₹७५,००० रुपयांची देणगी दिली.

या सोहळ्यास नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष कैलास पानसरे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ चालक नाना जाधव, तेली समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडेचे सेक्रेटरी प्रदीप टेकवडे, पत्रकार विलास भेगडे यांच्यासह अनेक मान्यवर, नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृ–पितृ पूजनातून समाजपूजन, विकासातून संस्कृतीचे जतन आणि सेवेतून राष्ट्रभक्ती हा त्रिसूत्री संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *