केक नव्हे मदतीचा हात उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा उपक्रम
केक नव्हे मदतीचा हात
उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा उपक्रम
तळेगाव दाभाडे : वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न ठरता समाजाप्रती कर्तव्याची जाणीव करून देणारा ठरावा, या उदात्त भावनेतून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या १९ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त यंदा समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय गणेशभाऊ काकडे मित्र परिवाराने घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
अलीकडे पाटण परिसरात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक व भौतिक नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी गणेश काकडे व त्यांचा मित्रपरिवार प्रत्यक्ष पाटण येथे जाऊन मदतकार्य करणार आहे. यावेळी पाटण येथील तिकोणे कुटुंबातील भगिनीस आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, मावळ तालुक्यातील अग्रगण्य समाजसेवी संस्था संपर्क बालग्राम भाजे या सेवाभावी संस्थेलाही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी येथील घारे कुटुंबीयांचे शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झालेल्या घराच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार असून, संकटग्रस्त कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हा समाजोपयोगी उपक्रम शुक्रवार, १७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता वतन नगर येथील लँड डेव्हलपर्स ऑफिस येथून सुरू होणार आहे.





