क्राईम

गहाण सदनिका विक्रीचा बिल्डरांचा कारनामा वडगाव मावळ हादरले दोघे फरार


गहाण सदनिका विक्रीचा बिल्डरांचा कारनामा वडगाव मावळ हादरले दोघे फरार

वडगाव मावळ : सर्वसामान्यांच्या घरकुलाच्या स्वप्नावर बुलडोझर फिरवणारा बिल्डरांचा धक्कादायक कारनामा वडगाव मावळ येथे उघडकीस आला आहे. आधीच बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिकांचा पूर्ण मोबदला स्वीकारून एका ग्राहकासोबत करार करायचा आणि त्याच सदनिका परस्पर इतर तिघांना विकायच्या, असा विश्वासघातकी व्यवहार समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही आरोपी फरार आहेत.

वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व्हे क्र. 63/7 मधील प्लॉट क्र. 19 व 20 येथे उभारण्यात आलेल्या ‘साई अनिरुद्ध धाम’ या निवासी व व्यापारी प्रकल्पात हा प्रकार घडला. एस. एम. डब्ल्यू. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विकसक सतीश महेश वाघेला व महेश मोहन वाघेला (रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदनिका क्र. 101, 102 व 105 या सदनिकांचा पूर्ण मोबदला चंद्रकांत शामराव ठोंबरे यांच्याकडून स्वीकारण्यात आला होता. करारही करण्यात आला. मात्र त्यानंतर ह्याच सदनिका अनुक्रमे दत्तात्रेय संजय केसकर, अशोक संजय केसकर व रुपाली सुहास ढोरे यांना नोंदणीकृत करारनाम्याद्वारे विकण्यात आल्या. म्हणजे एकाच घराचे अनेक मालक असा धक्कादायक प्रकार उघड झाला.

इतकेच नव्हे तर, सदनिका क्र. 101, 102, 104, 105, 205, 301, 304, 404, 405 तसेच व्यापारी गाळे क्र. 01 ते 04 या सर्व मिळकती कर्वे रोड, पुणे येथील नांदेड मर्चंट बँकेत सुमारे एक कोटी रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही बाब ग्राहकांपासून लपवून ठेवत विकसकांनी संपूर्ण रक्कम उकळली व ताबाही दिला. परिणामी, घरकुलाच्या आशेने आयुष्याची कमाई गुंतवणाऱ्या नागरिकांवर जप्तीची तलवार लटकत आहे.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र न घेता व्यवहार केल्याचा आरोपही पुढे आला आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या रकमेचा स्वतंत्र बँक खात्यात पारदर्शक हिशोब न ठेवता अपहार केल्याचेही उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे हा केवळ व्यवहारातील घोळ नसून नियोजनबद्ध आर्थिक फसवणूक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316 (5), 318 (2), 318 (4), 3 (5) तसेच महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम 1963 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, वडगाव मावळ परिसरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. घर खरेदी करायचे तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बिल्डरराजच्या बेफाम कारभारावर अंकुश आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *