इंद्रायणी विद्या मंदिरात 4 नोव्हेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन: फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल यांची प्रमुख उपस्थिती: दोन हजारांहून अधिक मान्यवर सहभागी होणार
इंद्रायणी विद्या मंदिरात 4 नोव्हेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन: फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल यांची प्रमुख उपस्थिती: दोन हजारांहून अधिक मान्यवर सहभागी होणार
तळेगाव दाभाडे : औषधोपचारातील निष्काळजीपणा, प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर आणि अपूर्ण औषधोपचार यामुळे निर्माण होणारा प्रतिजैविक प्रतिकार (Antimicrobial Resistance – AMR) हा सार्वजनिक आरोग्यापुढील गंभीर धोका बनत आहे. या पार्श्वभूमीवर औषधांचा विवेकपूर्ण वापर, रुग्णसुरक्षा आणि उपचार प्रक्रियेतील फार्मासिस्टचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे राज्यस्तरीय जनजागृतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2026 निमित्त पश्चिम महाराष्ट्र व मुंबई विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे होणार आहे.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार निरुपा कानिटकर, राज्य समन्वयक प्रा. प्रवीण जावळे, प्रा. डॉ. संजय आरोटे आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरोधातील जनजागृती रॅलीने होणार आहे. अनावश्यक प्रतिजैविक सेवन, वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे आणि निर्धारित उपचारक्रम अपूर्ण ठेवणे यामुळे जिवाणूंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकार निर्माण होण्याचा धोका वाढतो. याबाबत नागरिकांना शास्त्रीय माहिती देण्याचा रॅलीचा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी साय-टून, पोस्टर सादरीकरण, प्रश्नमंजुषा, माहितीपत्रक, पथनाट्य आणि रील मेकिंग अशा सहा राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत. विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
परिसंवादात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकारे, प्रा. मंजिरी घरत, डॉ. संजय तोष्णीवाल, डॉ. सुहित गिल्डा, डॉ. बी. एस. कुचेकर आणि डॉ. सथियानारायणन यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्था 1965 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, या उपक्रमातून सामाजिक आरोग्यविषयक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मुंबई विभागातील डी. फार्म., बी. फार्म., एम. फार्म. आणि फार्म. डी. अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, फार्मासिस्ट तसेच औषधनिर्माण क्षेत्रातील दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
औषध हे उपचाराचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अयोग्य वापर भविष्यातील उपचारक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. त्यामुळे सक्षम फार्मासिस्ट, शास्त्रीय औषधोपचार आणि जनजागृती यांच्या माध्यमातून सुरक्षित औषधोपचार संस्कृती निर्माण करण्याचा संदेश या राज्यस्तरीय संमेलनातून दिला जाणार आहे.




