कामशेतमध्ये महामार्गालगत अतिक्रमणांचा सुळसुळाट: कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त
कामशेतमध्ये महामार्गालगत अतिक्रमणांचा सुळसुळाट: कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त
कामशेत : जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत अतिक्रमणांचे जाळे पुन्हा विस्तारताना दिसत असून, रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या भंगार दुकानांमुळे परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः धुरकट झाले आहे. कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे वातावरणात प्रदूषणाचे सावट पसरले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर भंगार दुकाने उभारण्यात आली आहेत. या दुकानांमधून नियमितपणे कचरा जाळला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास हे प्रकार अधिक वाढत असल्याने परिसर धुराच्या विळख्यात सापडत आहे. धुराचे दाट लोट, तीव्र दुर्गंधी आणि हवेत मिसळणारे घातक कण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. रात्रीच्या वेळी या भंगार व्यवसायिकांच्या हालचाली संशयास्पद असतात. मागील काही वर्षांपूर्वी असामाजिक तत्त्वाच्या संदर्भात तपास यंत्रणांनी कामशेत मध्ये येऊन तपास केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात
श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि घशात खवखव अशा तक्रारींमध्ये वाढ होत असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक विशेषतः त्रस्त झाले आहेत. रात्री झोपही लागत नाही, घरात धूर शिरतो, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी कामशेतजवळील कुसगाव परिसरात भंगार साठ्यामुळे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. तरीदेखील प्रशासनाने यापासून धडा घेतलेला दिसत नाही. यापूर्वी पीएमआरडीओ व आयआरबी यांच्या संयुक्त कारवाईत महामार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, काही काळातच पुन्हा अतिक्रमण उभे राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.
नागरिकांकडून आता थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे की, संबंधित अधिकाऱ्यांकडून पुन्हा कारवाई का केली जात नाही? अतिक्रमण पुन्हा वाढत असताना प्रशासन मात्र गप्प का, असा सवाल विचारला जात आहे. यामागे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना, अशी जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.
महामार्ग सुरक्षा, पर्यावरणीय संतुलन आणि नागरिकांचे आरोग्य या तिन्ही बाबी धोक्यात आल्याचे चित्र असून, तातडीने ठोस कारवाईची मागणी होत आहे. अन्यथा धुरात हरवणारे कामशेत अशी ओळख निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





