महत्त्वाचे

ऐतिहासिक कार्ल्याची ओळख पुसून न्यू लोणावळा चा बाजार! प्रशासन झोपलेय की व्यावसायिकांच्या जाहिरातींना मूक संमती?कार्ल्याच्या नावावर व्यावसायिकांची मनमानी; ग्राहकांची दिशाभूल, स्थानिक नागरिक संतप्त; तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!


ऐतिहासिक कार्ल्याची ओळख पुसून न्यू लोणावळा चा बाजार! प्रशासन झोपलेय की व्यावसायिकांच्या जाहिरातींना मूक संमती?कार्ल्याच्या नावावर व्यावसायिकांची मनमानी; ग्राहकांची दिशाभूल, स्थानिक नागरिक संतप्त; तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

 

 

 

लोणावळा :ज्या कार्ल्याच्या ऐतिहासिक लेण्यांनी जगाच्या नकाशावर मावळची ओळख निर्माण केली, ज्या भूमीत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात, त्याच कार्ल्याची ओळख आता काही बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिरातींमध्ये पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्ला गावाला ‘न्यू लोणावळा’ असे नामकरण करून गृहप्रकल्पांची जाहिरातबाजी सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी ऐतिहासिक गावाचे नामकरण करण्याचा अधिकार नेमका कोणी दिला? प्रशासनाने याकडे डोळेझाक का केली? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.

 

कार्ला हे केवळ मावळ तालुक्यातील एक गाव नाही, तर महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून विकसित झालेल्या कार्ला लेण्यांमधील भव्य चैत्यगृह, दगडी कोरीवकाम आणि बौद्धकालीन स्थापत्यकला आजही जगभरातील अभ्यासकांना आकर्षित करते. एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर या परिसराचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करते. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असलेल्या गावाला व्यावसायिक जाहिरातींच्या माध्यमातून ‘न्यू लोणावळा’ म्हणून पुढे आणले जात असल्याने कार्ल्याच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

मुंबई-पुणे महामार्गालगत काही बांधकाम प्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर ‘न्यू लोणावळा’ असे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. या नामकरणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुनील तावरे यांनी वडगाव मावळचे तहसीलदार आणि लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

प्रशासनाचा कारभार नेमका कोणासाठी?

 

कार्ला परिसर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर असताना त्याला ‘न्यू लोणावळा’ संबोधण्यास अधिकृत मान्यता आहे का, याचा खुलासा प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. असे नामकरण करण्याचा कोणताही अधिकृत आदेश असल्यास तो जनतेसमोर आणावा. अन्यथा संबंधित जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी तावरे यांनी केली आहे.

 

मात्र, प्रश्न केवळ एका होर्डिंगचा नाही. शहराच्या नावाचा वापर करून ग्रामीण भागातील प्रकल्पांना वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यातून ग्राहकांच्या मनात भौगोलिक सीमा, नागरी सुविधा आणि प्रकल्पाचे प्रत्यक्ष ठिकाण याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशा जाहिरातींची सत्यता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची नाही काय? नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? की जाहिरातबाजी सुरू असेपर्यंत यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेणार?

 

कार्ल्याची ओळख जाहिरातींच्या बाजारात गहाण ठेवणार का?

 

ऐतिहासिक गावांची ओळख जपणे ही केवळ ग्रामस्थांची जबाबदारी नाही; ती प्रशासनाचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक इतिहास आणि भौगोलिक वस्तुस्थिती बाजूला सारता येणार नाही. महसूल प्रशासनाने संबंधित फलकांची परवानगी, नामकरणाचा आधार आणि जाहिरातींची वैधता तपासावी. ग्राहकांची दिशाभूल होत असल्यास सक्षम प्राधिकरणाने नियमानुसार कारवाई करावी.

 

कार्ला गावाचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे; एखाद्या बांधकाम प्रकल्पाच्या जाहिरातीपुरता तो मर्यादित नाही. व्यावसायिकांच्या जाहिरातींच्या फलकांवर कार्ल्याचे नाव बदलले म्हणून गावाची ओळख बदलत नाही. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अशा मनमानीला प्रोत्साहन मिळत असल्याचा समज निर्माण होऊ नये, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. आता कार्ला ‘कार्ला’च राहणार की जाहिरातींच्या बाजारात ‘न्यू लोणावळा’ बनणार, याचा स्पष्ट खुलासा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *