बातमी हवी मोफत, प्रसिद्धी हवी मोठी: पत्रकाराच्या मानधनाचे काय?
बातमी हवी मोफत, प्रसिद्धी हवी मोठी: पत्रकाराच्या मानधनाचे काय?
पुणे:आपल्या समाजात पत्रकारांकडे माहिती आणि प्रसिद्धी मिळवून देणारे हक्काचे माध्यम म्हणून पाहिले जाते. मात्र या कामामागील मेहनतीचे आर्थिक मूल्य देण्याची वेळ आली की अनेक जण हात आखडता घेतात. लग्नसमारंभ असो, सामाजिक उपक्रम असो किंवा राजकीय कार्यक्रम; प्रत्येक ठिकाणी एकच विनंती ऐकायला मिळते, साहेब, आमची बातमी पेपरमध्ये लावा.
फोनवरही सुरुवात ठरलेलीच असते, दोन मिनिटांचे काम आहे!मात्र या दोन मिनिटांच्या कामासाठी पत्रकाराला माहिती संकलन, घटनास्थळाची पाहणी, संबंधितांशी संपर्क, छायाचित्रण, वस्तुस्थितीची पडताळणी आणि प्रभावी शब्दरचनेत बातमी तयार करण्यासाठी कित्येक तास खर्च करावे लागतात. याची जाणीव किती जणांना असते?
काही जण व्हॉट्सॲपवर चार ओळी पाठवून बातमी प्रसिद्ध करण्याची अपेक्षा करतात. बातमी प्रसिद्ध झाली की प्रसिद्धीचा लाभ घेतात; मात्र पत्रकाराच्या श्रमांचा मोबदला देण्याचा विचारही करत नाहीत. पत्रकार म्हणजे प्रेसनोटची कॉपी-पेस्ट करणारी मशीन किंवा मोफत न्यूज गुगल आहे का?
डॉक्टरांच्या उपचारांना, वकिलांच्या सल्ल्याला, छायाचित्रकाराच्या कलेला आणि अभियंत्याच्या कामाला मोबदला दिला जातो. मग पत्रकाराच्या ज्ञानाला, अनुभवाला आणि लेखणीला किंमत का नसावी?
पत्रकारांनीही स्वतःच्या श्रमांचे मूल्य ओळखणे गरजेचे आहे. वृत्तांकन, विशेष लेखन, छायाचित्रण आणि जाहिरात यांचे स्वरूप स्पष्ट करून योग्य मानधन निश्चित करावे. संपादकीय बातमी आणि सशुल्क प्रसिद्धी यांतील फरक जपावा. बातमीची सत्यता आणि निष्पक्षता याबाबत कोणतीही तडजोड करू नये. सामाजिक हिताच्या बातम्यांसाठी सहकार्य जरूर करावे; मात्र प्रत्येकाला मोफत सेवा देण्याची अपेक्षा स्वीकारू नये.
पत्रकाराच्या लेखणीमागे अभ्यास, अनुभव, वेळ आणि आर्थिक गुंतवणूक असते. समाजानेही या श्रमांचा सन्मान केला पाहिजे.
पत्रकारिता ही केवळ प्रसिद्धीचे साधन नाही, ती लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पत्रकाराने समाजासाठी लिहावे; पण त्याच्या श्रमांचे मूल्यही समाजाने मान्य करावे!
पत्रकार म्हणजे फुकटचा न्यूज गुगल आहे का? पत्रकाराच्या लेखणीला किंमत कधी मिळणार?




