सामाजिक

सकस चाऱ्यातून पशुधन समृद्धीचा ध्यास! बेबड ओहोळमध्ये १०० टक्के अनुदानावर मका बियाण्यांचे वाटप


सकस चाऱ्यातून पशुधन समृद्धीचा ध्यास! बेबड ओहोळमध्ये १०० टक्के अनुदानावर मका बियाण्यांचे वाटप

 

बेबड ओहोळ (मावळ): पशुधनाचे आरोग्य, दुग्धोत्पादनात वाढ आणि पशुपालकांचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी सकस चाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन चारा साक्षरता अभियान २०२६ अंतर्गत बेबड ओहोळ येथे पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून पशुपालकांना चारा व्यवस्थापनाचे शास्त्रीय महत्त्व पटवून देण्याबरोबरच वर्षभर पुरेसा आणि दर्जेदार चारा उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

 

पशुवैद्यकीय चिकित्सालय, बेबड ओहोळ येथे आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती च्या सभापती मनिषा येवले आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी रामदास गाडे यांच्या हस्ते पशुपालकांना मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

 

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश अभ्यंकर आणि डॉ. सरोजा पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारा पिकांचे महत्त्व, मका पिकाची लागवड, उत्पादनवाढ आणि चाऱ्याचे योग्य नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. केवळ हिरवा चारा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून त्याचे योग्य पद्धतीने संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

पावसाळ्यानंतर किंवा चाऱ्याची टंचाई निर्माण होणाऱ्या काळात जनावरांना पोषक आहार मिळावा, यासाठी मुरघास (सायलेज) तयार करण्याचे तंत्रज्ञान पशुपालकांना समजावून सांगण्यात आले. तसेच उपलब्ध निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सकस चारा म्हणजेच निरोगी पशुधन आणि अधिक दूध उत्पादनाचा पाया असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.

 

या कार्यक्रमास मनोज येवले, बेबड ओहोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजल घारे, राकेश घारे आणि प्रमोद गायकवाड उपस्थित होते. या उपक्रमाला परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

चारा टंचाईवर मात, पशुधनाचे पोषण आणि दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीने चारा साक्षरता अभियानाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *