टायगर पॉईंटच्या ४०० फूट खोल दरीत कोसळून २० वर्षीय अनिकेत साबळेचा मृत्यू:शिवदुर्ग रेस्क्यू टीमची अडीच तासांची थरारक बचावमोहीम; निसरडे कडे, दगडात अडकलेले स्ट्रेचर अन् प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मृतदेह बाहेर काढण्यात आला
टायगर पॉईंटच्या ४०० फूट खोल दरीत कोसळून २० वर्षीय अनिकेत साबळेचा मृत्यू:शिवदुर्ग रेस्क्यू टीमची अडीच तासांची थरारक बचावमोहीम; निसरडे कडे, दगडात अडकलेले स्ट्रेचर अन् प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मृतदेह बाहेर काढण्यात आला
लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर पॉईंट येथे सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (४ नोव्हेंबर) उघडकीस आली. अनिकेत भीमा साबळे (वय २०, रा. रामनगर, भुशीगाव, लोणावळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. खोल दरीत अडकलेला मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अडीच तासांच्या अत्यंत आव्हानात्मक बचावमोहिमेनंतर बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री मदतीचा फोन; सकाळी बचावमोहीम
३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा शिवदुर्ग रेस्क्यू टीमला टायगर पॉईंट परिसरातून मदतीसाठी फोन आला. दरीत उतरण्याच्या मार्गाजवळ सुमारे १०० ते १५० फूट खाली एक तरुण झाडावर अडकलेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने दरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. रात्रीची वेळ, पावसाचे वातावरण आणि खोल दरीतील संभाव्य धोके लक्षात घेऊन टीमने बुधवारी सकाळी नऊ वाजता बचावमोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
निसरड्या दरीत जीव धोक्यात घालून शोधकार्य
आवश्यक दोरखंड, हार्नेस, हेडलॅम्प, वॉकीटॉकी आणि बचाव साहित्य घेऊन टीम घटनास्थळी दाखल झाली. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतल्यानंतर योगेश उंबरे आणि हर्ष तोंडे यांनी सुरक्षिततेची साधने वापरून दरीत उतरण्यास सुरुवात केली. पावसामुळे खडक निसरडे झाले होते. अखेर सुमारे ४०० फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेह आढळला. छायाचित्रांच्या आधारे त्याची ओळख अनिकेत साबळे अशी निश्चित झाली.
दगडात अडकले स्ट्रेचर; ड्रोनच्या मदतीने मार्ग शोधला
मृतदेह सुरक्षितपणे पॅक करून स्ट्रेचरला बांधण्यात आला. दोरखंडाच्या साहाय्याने तो वर आणताना स्ट्रेचर एका दगडात अडकले. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने अडथळ्याचे ठिकाण निश्चित करून दुसऱ्या बाजूने स्ट्रेचर खेचण्यात आले. अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
अनेकांचे मोलाचे योगदान
या बचावमोहिमेत सागर दळवी, सागर कुंभार, योगेश उंबरे, हर्ष तोंडे, प्रिन्स बैठा, महेश मसने, गणेश भांगरे, भावेश दानवे, आनंद गावडे, शैलेश उंबरे, साहेबराव चव्हाण, महादेव भवर, पिंटू मानकर, संतोष मरगजे (पोलीस पाटील), सुनील गायकवाड आदी सहभागी झाले. स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी झाली.
तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून, प्रतिकूल परिस्थितीत शिस्तबद्ध नियोजन आणि अथक प्रयत्नांनी बचावकार्य पूर्ण करणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.




