मावळातील 12 गावांतील पशुपालक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप: कामशेतमध्ये 16 नोव्हेंबरला उपक्रम:निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिकही होणार: आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे पशुपालकांना आवाहन
मावळातील 12 गावांतील पशुपालक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप: कामशेतमध्ये 16 नोव्हेंबरला उपक्रम:निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिकही होणार: आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे पशुपालकांना आवाहन
कामशेत : पशुधनाचे आरोग्य आणि दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी सकस चारा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने चारा साक्षरता अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 12 गावांमधील पशुपालक शेतकऱ्यांसाठी वैरण बियाणे वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. 16 नोव्हेंबर2026 रोजी कामशेत येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा उपक्रम पार पडणार आहे.
या अभियानांतर्गत कामशेत, नायगाव, अहिरवाडी, चिखलसे, येवलेवाडी, कुसगाव, पिंपळोली, पाथरगाव, मुंढावरे, वळक, बुधवडी आणि खामशेत या गावांतील पात्र शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केवळ बियाणे वाटपापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याचे पोषणमूल्य वाढवून तो सकस कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येणार आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चारा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. वाढता पशुखाद्य खर्च, चाऱ्याची उपलब्धता आणि जनावरांचे आरोग्य या पार्श्वभूमीवर वैरण बियाणे वाटप आणि चारा प्रक्रिया प्रात्यक्षिकाचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, जुलै महिन्यानंतर काढलेला सातबारा व आठ-अ उतारा (ऑनलाइन डिजिटल उतारा ग्राह्य), रेशनकार्ड आणि आधारकार्ड ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांशिवाय वैरण बियाणे मिळणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद सदस्य दीपाली हुलावळे, पंचायत समिती सदस्य समीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच ग्रामसेवक, सरपंच व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. रामदास गाडे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र अभ्यंकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कागदपत्रे जमा करण्याची वेळ सकाळी 11 ते 12 तर बियाणे वाटपाची वेळ दुपारी 12 ते 1अशी आहे. पशुवैद्यकीय दवाखाना, कामशेत यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा संबंधित गावांतील पशुपालक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




