आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाखाली ढोंग: पत्रकारितेची शिकवण देणारेच अनधिकृत साटेलोट्यात
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाखाली ढोंग: पत्रकारितेची शिकवण देणारेच अनधिकृत साटेलोट्यात
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हा आदर्श पत्रकारितेचा उत्सव असायला हवा होता. निर्भीड लेखणी, सत्तेला सवाल विचारण्याचे धाडस आणि समाजहितासाठी उभे ठाकण्याची परंपरा जपणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे विचार आजही मार्गदर्शक मानले जातात. मात्र या कार्यक्रमात घडलेले दृश्य पाहता, आजच्या तथाकथित पत्रकारितेचा खरा चेहरा उघडा पडला.
कार्यक्रम ठिकाणी निर्भीड पत्रकारितेच्या गप्पा रंगत होत्या. सत्यासाठी लढा “सत्तेला प्रश्न विचारा” अशा घोषणांचा पाऊस पडत होता. पण याच ठिकाणी कथित अनधिकृत हॉटेल मालकाशी काही पत्रकार मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. विशेष म्हणजे, या व्यक्तीवर बेकायदेशीर कारभाराचे आरोप सर्वश्रुत असतानाही, या ‘मार्गदर्शकां’नी आजवर कधीच त्याविरोधात परखड बातमी केली नाही.
प्रश्न साधा आहे—जर हे सर्व माहीत होते, तर मौन का? की वार्षिक भोजन-मदिरा, जाहिराती आणि अन्य सवलतींमुळे लेखणी बोथट झाली? आणखी धक्कादायक बाब म्हणजे, कार्यक्रमात काही माध्यम प्रतिनिधींनी त्या कथित बेकायदेशीर मालकाला ‘लीड’ देत उघडपणे मिरवले. जणू काही तोच कार्यक्रमाचा नायक
शासकीय अधिकारी उपस्थित असतानाही, त्यांच्यासमोरच या व्यक्तीचा उदोउदो करण्यात आला. आम्ही फक्त जाहिरातदाराची बातमी करतो असे सांगणाऱ्या पाकिट पत्रकारांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा उघड झाले. सामाजिक प्रश्न, नागरी समस्या, सर्वसामान्यांचे दुःख—या विषयांवर ज्यांची लेखणी कधीच चालली नाही, तेच आपल्या अनुभवाच्या जोरावर वर्षानुवर्षे ‘मलिदा’ उपटत राहिले.
एकीकडे जांभेकरांच्या निर्भीड परंपरेचा गजर आणि दुसरीकडे उघड साटेलोट्याचे प्रदर्शन—हा दुटप्पीपणा नेमका कुणासाठी? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाखाली चाललेले हे ढोंग थांबणार कधी? आजची पत्रकारिता स्वतःकडे आरशात पाहून “आपण नेमके काय करत आहोत? असा सवाल विचारणार का, की लाजेची सीमाही ओलांडून हा खेळ असाच सुरू राहणार?





