महत्त्वाचे

स्कूल व्हॅनमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर! क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतुकीची चौकशी करा: सहाय्यकांची नियुक्ती नाही: शाळा व्यवस्थापन समित्या, वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह शिवसेना शहराध्यक्ष शंकर भेगडे यांची मागणी


स्कूल व्हॅनमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर! क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतुकीची चौकशी करा: सहाय्यकांची नियुक्ती नाही: शाळा व्यवस्थापन समित्या, वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह शिवसेना शहराध्यक्ष शंकर भेगडे यांची मागणी

 

तळेगाव दाभाडे : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी असलेल्या स्कूल व्हॅनमधूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही स्कूल व्हॅनमध्ये वाहनाच्या मंजूर आसनक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचा आरोप होत असून, अनेक वाहनांमध्ये विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी आवश्यक असलेले सहाय्यकही नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेना तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष शंकर निवृत्ती भेगडे यांनी स्कूल व्हॅनची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. वाहनांची प्रत्यक्ष आसनक्षमता, विद्यार्थ्यांची संख्या, चालकाची पात्रता, वाहनाची कागदपत्रे आणि सहाय्यकाची उपलब्धता यांची काटेकोर तपासणी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

विशेष म्हणजे अनेक शाळांमध्ये स्कूल व्हॅन मालक आणि शाळा व्यवस्थापन समित्या अस्तित्वात असतानाही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षेच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या, वाहनांची क्षमता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत शाळा व्यवस्थापनाने नियमित देखरेख ठेवणे अपेक्षित असताना या बाबींकडे कानाडोळा का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

तसेच वाहतूक पोलीस, आरटीओ विभाग आणि काही स्कूल व्हॅन मालक यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होते का? याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी भेगडे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न केवळ दंडात्मक कारवाईपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक स्कूल व्हॅनची तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करावी. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी मागणी शंकर निवृत्ती भेगडे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *