मावळला पत्रकार भवन कधी? विकासाच्या शर्यतीत चौथा स्तंभ सुविधांअभावी मागे
मावळला पत्रकार भवन कधी? विकासाच्या शर्यतीत चौथा स्तंभ सुविधांअभावी मागे
वडगाव मावळ :
मावळ तालुका विकासाच्या आघाडीवर झेपावत असताना, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची अवस्था मात्र अद्यापही उपेक्षित असल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून, पत्रकार भवन उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यावर वसलेल्या मावळ तालुक्याने औद्योगिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. विविध विकासकामांमुळे तालुक्याची ओळख दिवसेंदिवस बळकट होत असताना, माहिती संप्रेषणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पत्रकार बांधवांना आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत, ही बाब खटकणारी ठरत आहे.
आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, लोणावळा, कामशेत, तळेगाव दाभाडे, देहूरोड, देहू, सोमाटणे, चांदखेड आदी भागांतील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांतील शंभराहून अधिक पत्रकारांचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे. या सर्वांचा मुख्य संपर्कबिंदू म्हणजे वडगाव मावळ. तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असल्याने येथे सतत हालचाली सुरू असतात.
तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे, नगरपंचायत, भूमी अभिलेख, न्यायालय यांसारख्या महत्त्वाच्या कार्यालयांमुळे नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा ओघ वडगावकडे कायम असतो. सुमारे १०२ ग्रामपंचायतींचे प्रश्न, निवेदने, आंदोलन आणि बैठका यामुळे हे ठिकाण सतत गजबजलेले असते. परिणामी पत्रकारांची उपस्थिती येथे अनिवार्य ठरते.
मात्र, इतक्या मोठ्या कार्यक्षेत्रात पत्रकारांसाठी स्वतंत्र, सुसज्ज आणि अधिकृत जागा नसल्याने वार्तांकन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बैठका घेण्यासाठी, माहिती संकलनासाठी किंवा बातम्या पाठवण्यासाठी कोणतेही ठोस केंद्र उपलब्ध नसल्याने पत्रकारांची कोंडी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे शहरात तसेच शेजारील मुळशी तालुक्यात पत्रकार भवनाची सुविधा उपलब्ध असताना मावळमध्ये ती नसणे ही विसंगती अधिक ठळकपणे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथे पत्रकार भवन उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ज्येष्ठ पत्रकार रामदास वाडेकर यांनी सांगितले की, मावळ तालुका सर्वच बाबतीत पुढे असताना पत्रकारांसाठी मूलभूत सुविधा नसणे ही खेदजनक बाब आहे. पत्रकार भवन उभारणे ही काळाची गरज बनली आहे.
एकूणच, मावळचा विकास जितक्या वेगाने होत आहे, तितक्याच गांभीर्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे लक्ष देणे आवश्यक ठरत आहे. पत्रकार भवन उभारणीसाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





