सामाजिक

अंधारातून उजेडाकडे : डॉ. अशोक दातेंच्या माणुसकीने तरुणाच्या आयुष्याला नवी दिशा


अंधारातून उजेडाकडे : डॉ. अशोक दातेंच्या माणुसकीने तरुणाच्या आयुष्याला नवी दिशा

टाकवे (मावळ)
गरिबी, आजारपण आणि नैराश्याच्या अंधारात हरवलेले आयुष्य एका देवमाणसाच्या माणुसकीमुळे पुन्हा उजेडात आले, अशी प्रेरणादायी घटना टाकवे-नाणे परिसरात घडली आहे. सोमनाथ चंद्रकांत भोईर (वय २०) या तरुणाच्या आयुष्याला डॉ. अशोक दाते यांच्या निःस्वार्थ सेवेने नवे वळण मिळाले आहे.

लहानपणापासूनच सोमनाथला डोळ्यांचा त्रास होता. इयत्ता पाचवीत असतानाच डाव्या डोळ्याने कमी व धुरकट दिसू लागल्याने त्याच्या शिक्षणावर परिणाम झाला. फळ्यावरचे अक्षर दिसत नसल्याने अभ्यासात मन लागत नव्हते. दैनंदिन जीवनातसुद्धा साधी कामे करणे त्याला कठीण झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील गवंडी कामगार, आई शेतमजूर. अशा परिस्थितीत शिक्षणाची आवड असूनही नाईलाजाने शाळा सोडावी लागली.

यानंतर कामाच्या शोधात भटकंती सुरू झाली. मात्र कमी दिसत असल्यामुळे अनेक ठिकाणी नकार मिळाला. शेवटी एका बंगल्यावर गार्डनिंगचे काम मिळाले; पण डोळ्यांचा त्रास तिथेही अडचणीचा ठरू लागला. पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मोतीबिंदूचे निदान झाले. मात्र कमी वयामुळे शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नैराश्यात गेले.

दरम्यान, टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराची माहिती सोमनाथला मिळाली. हे शिबिर डॉ. अशोक दाते यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते. तपासणीनंतर सोमनाथने आपली संपूर्ण व्यथा डॉक्टरांसमोर मांडली. डॉ. दातेंनी त्याला धीर देत सर्व गैरसमज दूर केले आणि एकही रुपया खर्च न येता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून देण्याचे आश्वासन दिले.

आपला शब्द पाळत डॉ. दातेंनी सोमनाथसह तब्बल २० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या. आज सोमनाथ पुन्हा स्पष्ट पाहू लागला असून त्याच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली आहे. डॉ. अशोक दाते हे केवळ उत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ नाहीत, तर खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणारे देवमाणूस असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *