तळेगावात मास्टरमाइंड अकॅडमी चा पदवीदान सोहळा उत्साहात; २१ विद्यार्थ्यांचा गौरव
तळेगावात मास्टरमाइंड अकॅडमी चा पदवीदान सोहळा उत्साहात; २१ विद्यार्थ्यांचा गौरव
तळेगाव दाभाडे :
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला, तार्किक विचारसरणीला आणि गणिती कौशल्याला नवी दिशा देणाऱ्या मावळ तालुक्यातील नामांकित मास्टरमाइंड अकॅडमीच्या वतीने पदवीदान समारंभ २०२६ तळेगाव दाभाडे येथील कलापिनी रंगमंचावर अत्यंत दिमाखात व उत्साहात पार पडला. ज्ञान, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या २१ ‘मास्टरमाइंड’ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
या सोहळ्यात सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी इशा भुषण काळोखे तसेच आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी सानवी संतोष धामणकर या दोन गुणवंत विद्यार्थिनींना विशेष मास्टरमाइंड पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या विद्यार्थिनींचा उल्लेख मान्यवरांनी आपल्या भाषणात केला.
कार्यक्रमाला परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली. यामध्ये आमदार सुनिल शेळके. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यादवेंद्र खळदे,नगरसेवक इंदरशेठ ओसवाल, संतोष खांडगे, उद्योजक दिपकभाई शहा, श्री. श्रीशैल मंथे, . सुरेश झेंड , विलास जाधव नगरसेविका सौ. हेमलता खळदे, नगरसेविका संगीताकाकी खळदे, नगरसेविका भारतीताई धोत्रे, दीपक हुलावळे, शासकीय अधिकारी शिल्पा रोडगे आणि शुभांगी कारले यांचा प्रामुख्याने समावेश होता. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना पालकांच्या योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठांतर नव्हे, तर विचारक्षम बुद्धिमत्ता आणि समस्या सोडविण्याची कला महत्त्वाची आहे. मास्टरमाइंड अकॅडमी ही विद्यार्थ्यांमध्ये हीच क्षमता विकसित करत आहे,असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही पदवी म्हणजे त्यांच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीचा पाया असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत अकॅडमीच्या शिक्षकवृंदाचे आभार मानले. संपूर्ण वातावरणात यशाचा आनंद, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा संगम अनुभवायला मिळाला.





