अनधिकृत नळजोडण्यांवर नगरपरिषदेकडून कारवाई तळेगाव दाभाडे येथे १० मालमत्ताधारकांची नळजोडणी बंद. पुढील काळात मोहीम अधिक तीव्र
अनधिकृत नळजोडण्यांवर नगरपरिषदेकडून कारवाई
तळेगाव दाभाडे येथे १० मालमत्ताधारकांची नळजोडणी बंद. पुढील काळात मोहीम अधिक तीव्र
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात नगरपरिषदेकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमानुसार राहावा यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून आजतागायत १० मालमत्ताधारकांच्या अनधिकृत नळजोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.
नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी विनापरवाना व नियमबाह्य पद्धतीने नळजोडण्या घेण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण निर्माण होत असून महसुलाचेदेखील नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या पथकांनी शहरातील विविध भागात पाहणी करून अनधिकृत जोडण्या शोधून त्यावर तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आजपर्यंत १० मालमत्तांवरील नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून येत्या काळात ही मोहीम आणखी वेगाने राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनधिकृत नळजोडण्या आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह नळजोडणी कायमस्वरूपी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप अधिकृत परवानगी न घेता नळजोडणी घेतली आहे, त्यांनी तात्काळ नगरपरिषदेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून आपली नळजोडणी नियमित करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे पालन करून अधिकृत जोडणी घेतल्यास पुढील कारवाई टाळता येईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पारदर्शक व सक्षम ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.





