तळेगाव दाभाडेत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर भरारी पथकांची राहणार करडी नजर
तळेगाव दाभाडेत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर भरारी पथकांची राहणार करडी नजर
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, उघड्यावर कचरा फेकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांत ही पथके नियमित गस्त घालत असून, कचरा टाकताना रंगेहात पकडलेल्या नागरिकांवर जागीच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक नागरिक घंटागाडीची प्रतीक्षा न करता रस्ते, चौक, नालेकाठ आणि मोकळ्या भूखंडांवर कचरा फेकत आहेत. परिणामी शहरात अस्वच्छता वाढून दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक गंभीर ठरत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
भरारी पथके पहाटे आणि सायंकाळच्या वेळी विशेष गस्त घालून संशयित ठिकाणांवर लक्ष ठेवणार आहेत. उघड्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणे यांसाठी स्वतंत्र दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.
दरम्यान, केवळ घंटागाडीत कचरा टाकणे पुरेसे नसून, ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा विलगीकरण न केल्यास संबंधितांचा कचरा उचलला जाणार नाही आणि नियमानुसार दंड आकारला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
घंटागाडीचाच वापर करा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचे आवाहन
नगरपरिषदेने प्रत्येक प्रभागासाठी घंटागाड्यांची वेळ व मार्ग निश्चित केले असून, नागरिकांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे. उघड्यावर कचरा टाकून शहराचे विद्रुपीकरण करू नका. आपल्या प्रभागात येणाऱ्या घंटागाडीतच कचरा द्या आणि प्रशासनाला सहकार्य करा .असे ते म्हणाले.
शहर स्वच्छतेसाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असली, तरी नागरिकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी तळेगाव दाभाडेसाठी प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वयच निर्णायक ठरणार आहे.





