मानवतेचा जागता दीप वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका रिक्षाचालक धावले मदतीला
मानवतेचा जागता दीप वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका रिक्षाचालक धावले मदतीला
तळेगाव दाभाडे : २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळेगाव-चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौक येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पादचारीही रस्त्यात अडकून पडले होते. या गोंधळात एक रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्याने परिसरात क्षणभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
रुग्णवाहिकेतील रुग्णाची स्थिती गंभीर असल्याची शक्यता लक्षात येताच जवळील आदर्श रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवत तत्काळ रस्त्यावर धाव घेतली. कोणतीही अधिकृत सूचना न मिळता त्यांनी स्वयंप्रेरणेने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. काहींनी वाहनचालकांना बाजूला घेण्याचे आवाहन केले, तर काहींनी स्वतः रस्त्यात उभे राहून मार्ग मोकळा केला. त्यांच्या या तत्परतेमुळे काही मिनिटांतच रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात यश आले आणि ती पुढील मार्गाने रवाना झाली.
या घटनेत विशेष काही नसल्यासारखे वाटत असले, तरी ही कृती सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरली. अनेकदा अशा प्रसंगी नागरिक संबंधित प्रशासनावर अवलंबून राहतात; मात्र वेळेचे भान ठेवून प्रत्येकाने पुढाकार घेतला तर अनेक जीव वाचू शकतात. रुग्णवाहिका कुठेही दिसली तरी तिला प्रथम प्राधान्य देऊन मार्ग मोकळा करून देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते व आदर्श रिक्षा स्टॅण्डचे मार्गदर्शक दिलीप डोळस यांनी सांगितले की, तळेगाव-चाकण महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. अशा वेळी आदर्श रिक्षा स्टॅण्डचे रिक्षाचालक स्वयंस्फूर्तीने वाहतूक पोलिसांना मदत करतात आणि कोंडी सोडविण्यास पुढाकार घेतात.
जागरूक व सतर्क नागरिक हेच देशाचे खरे भूषण असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.





