शिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी येथे निर्भय कन्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला युवा व्याख्यान व कराटे प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास


सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी येथे

निर्भय कन्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला युवा व्याख्यान व कराटे प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास

 

कामशेत : महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून कामशेत येथील सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्ट्री ऑफ इंजिनियरिंग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियानांतर्गत युवा व्याख्यान व कराटे प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, स्वसंरक्षणाचे तंत्र आत्मसात करणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक डॉ. सुबीर कुमार बॅनर्जी होते. अध्यक्ष सौ. गौरी भट्टाचार्य, सचिव डॉ. रितूपर्णा बॅनर्जी, खजिनदार श्रीजीत भट्टाचार्य, विश्वस्त डॉ. पार्थसारथी चौहान व सौ. सुवरा बॅनर्जी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी यशस्वीपणे पार पडली.

 

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार सौ. रेशमा फडतरे यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक युगात महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, सुरक्षिततेचा प्रश्न अद्याप समाजासमोर गंभीर स्वरूपात उभा आहे. केवळ शैक्षणिक यश पुरेसे नसून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे अत्यावश्यक आहे. आत्मसंरक्षण ही केवळ कौशल्याची बाब नसून ती आत्मविश्वासाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. प्रत्येक मुलगी सजग, सक्षम आणि निर्भय झाली तर समाज अधिक सुरक्षित आणि सशक्त बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत बापूजी संकपाळ यांनी विद्यार्थिनींना निर्भय व आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले. कॅम्पसमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

महिला कराटे प्रशिक्षक सौ. शितल तारे यांनी कराटेची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करत शंभरपेक्षा अधिक विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण दिले. आपत्कालीन प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे, मानसिक स्थैर्य कसे राखावे आणि धैर्याने परिस्थितीला सामोरे कसे जावे याबाबत त्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

या कार्यक्रमास डॉ. पूजा शर्मा, डॉ. राजेंद्र बाबर, डॉ. जितेंद्र सातपुते, डॉ. मृणाल जोशी, डॉ. अशिष मानवतकर, डॉ. गौरव भोसेकर, प्रा. अविनाश वाघमारे (विद्यार्थी विकास अधिकारी), प्रा. पूजा पवार (महिला तक्रार निवारण कक्ष अधिकारी) तसेच प्रा. दीपक पवार (राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाच्या यशाचे द्योतक ठरली.

 

विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, महिला तक्रार निवारण कक्ष व आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा सुपेकर हिने केले, तर आभार प्रदर्शन श्री. रितेश भोकरे यांनी मानले.

 

निर्भय कन्या अभियानामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागरूकता वाढून आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *