मतदार शोध मोहीम वेगात; तळेगाव दाभाडेत यादी पुनर्रिक्षणाला प्रारंभ
मतदार शोध मोहीम वेगात; तळेगाव दाभाडेत यादी पुनर्रिक्षणाला प्रारंभ
तळेगाव दाभाडे : लोकशाहीच्या पायाभूत प्रक्रियेला धार देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रात मतदारयादी पुनर्रिक्षण मोहिमेची प्रभावी सुरुवात झाली आहे. या उपक्रमातून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदारयादीत सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत २०२४ सालच्या अद्ययावत मतदारयादीची २००२ च्या जुन्या यादीशी बारकाईने पडताळणी केली जात आहे. दोन दशकांच्या कालावधीत यादीतून वगळली गेलेली नावे, तसेच चुकून नोंद न झालेल्या मतदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जात आहे. ज्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत होती; मात्र सध्याच्या यादीत आढळत नाहीत, त्यांची नोंद पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे.
त्याचबरोबर, निधन झालेले किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार यांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया देखील पार पाडली जाणार आहे. या सर्व कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर घरपोच सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक राहील.
नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ voters.eci.gov.in तसेच मोबाईल अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही अडचण भासल्यास संबंधित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेच्या तत्वावर आधारित असून, प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग नोंदविणे हेच उद्दिष्ट असल्याचे दापकेकर यांनी स्पष्ट केले. लोकशाहीच्या बळकटीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.





