तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात.उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात.उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी प्रभावी भाषणातून मराठी भाषेचा अभिमान आणि संस्कृतीचे वैभव अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, मुख्याधिकारी गिरिश दापकेकर, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. कुसुमाग्रजांसारख्या महान साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजप्रबोधन केले आणि मराठी भाषेला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून दिले. आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा वापर दैनंदिन जीवनात वाढवणे ही काळाची गरज आहे.
त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची सवय लावण्याचे आवाहन करत मराठी साहित्याचा वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून मराठी भाषेबद्दलची जाणीव आणि अभिमान अधिक दृढ करण्यास तो प्रेरणादायी ठरला.





