येलवाडी येथे नंदी महाराज मूर्तीचा वज्रलेप करून पुनर्स्थापना : संत तुकाराम महाराजांच्या दैवी साक्षात्काराची परंपरा पुन्हा उजळली
येलवाडी येथे नंदी महाराज मूर्तीचा वज्रलेप करून पुनर्स्थापना : संत तुकाराम महाराजांच्या दैवी साक्षात्काराची परंपरा पुन्हा उजळली
देहू/येलवाडी :
वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेतील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्मृती पुन्हा उजाळली जात असून, श्रीक्षेत्र येलवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या दैवी स्पर्शाने पावन झालेल्या नंदी महाराज मूर्तीची वज्रलेप करून सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात येत आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यमान वंशज, हरिभक्तीपरायण श्री. पुंडलिक महाराज देहुकर यांच्या प्रमुख पुढाकाराने हा उपक्रम साकारत असून, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे सहकार्य आणि येलवाडी ग्रामस्थांच्या सौजन्याने हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे.
वारकरी परंपरेनुसार, संत तुकाराम महाराज वैकुंठगमनानंतर आपल्या कन्या सौभाग्यवती भागिरथीबाई गाडे यांना भेटण्यासाठी सदेह पुन्हा पृथ्वीवर आल्याचा उल्लेख आढळतो. फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी त्यांनी लेकीने प्रेमाने बनवलेल्या शेवया स्वीकारण्यासाठी येलवाडी येथे येऊन येलेश्वर महादेवाची पूजा केली, असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. त्या प्रसंगी येलेश्वराते पुजिले, दुध नंदीचे काढिले असा दैवी साक्षात्कार घडल्याची आख्यायिका भक्तांमध्ये प्रचलित आहे.
त्या दिव्य क्षणात संत तुकाराम महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली नंदी महाराज मूर्ती पुढील काळात ऐतिहासिक घडामोडींमध्ये दुर्लक्षित राहिली. विशेषतः यवनी आक्रमणांच्या कालखंडानंतर ही मूर्ती अत्यंत जीर्ण आणि विपन्नावस्थेत पडून राहिल्याने वारकरी भाविकांच्या मनात तीव्र वेदना निर्माण होत होत्या.
या अवस्थेची दखल घेत संतवंशज पुंडलिक महाराज देहुकर यांनी सामान्य वारकऱ्यांच्या मनातील आर्त भावनेला प्रतिसाद दिला. संत तुकाराम महाराजांच्या हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम या अभंगातील संदेशाला कृतीत उतरवत त्यांनी नंदी महाराजांच्या मूर्तीचे संवर्धन आणि पुनर्स्थापनेचा संकल्प हाती घेतला.
त्याअनुषंगाने मूर्तीचा संपूर्ण वज्रलेप करून तिचे जतन करण्यात आले असून, आज फाल्गुन वद्य पंचमीच्या पावन दिनी ती पुन्हा सन्मानपूर्वक प्रतिष्ठापित करण्यात आली. या घटनेमुळे वारकरी संप्रदायातील भाविकांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत असून, संत परंपरेचे जतन करण्यासाठी उचललेले हे पाऊल प्रेरणादायी ठरत आहे.





