सामाजिक

आळंदी संस्थानकडून नास्तिक मेळाव्यातील वक्तव्यांचा तीव्र निषेध


आळंदी संस्थानकडून नास्तिक मेळाव्यातील वक्तव्यांचा तीव्र निषेध

आळंदी : पुणे येथे दिनांक २२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र नास्तिक मेळावा २०२६ मध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून धार्मिक व वारकरी वर्तुळात संतापाची लाट उसळली असून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संस्थानच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात डॉ. मुग्धा कर्णिक यांनी त्यांच्या भाषणामध्ये धर्म, पंथ व संस्कृती संदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचा कठोर शब्दांत समाचार घेण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, समतेचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्याबाबत विडंबनात्मक उल्लेख करून महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या श्री विठ्ठल व वारकरी परंपरेची वारी ही कालबाह्य असल्याचे विधान करणे अत्यंत खेदजनक आणि असंवेदनशील आहे. वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक चळवळ नसून ती सामाजिक एकात्मता, समता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे, असेही संस्थानने स्पष्ट केले.

संस्थानच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा देखील याच संतपरंपरेच्या उदार विचारसरणीचा परिणाम आहे, याचा विसर संबंधित वक्त्यांना पडला असावा. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी स्त्रियांना गुरुपद आणि संतपद देऊन समाजात समानतेचा नवा आदर्श निर्माण केला. गेली सुमारे ७५० वर्षे वारकरी संप्रदायाने समतेचा हा दीप अखंड पेटता ठेवला आहे.

या रे या रे लहान थोर, याति भलते नारीनर .करावा विचार न लगे चिता कोणाची. या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारांचा उल्लेख करत, संस्थानने सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे संतपरंपरेचे कार्य अधोरेखित केले. अशा महान परंपरेबाबत अभ्यासाशिवाय केलेली बेताल आणि बेछूट विधाने ही केवळ सवंग लोकप्रियतेसाठी केलेले प्रयत्न असल्याचा आरोपही संस्थानने केला आहे.

डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वारकरी भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून याप्रकरणी संबंधितांनी आत्मपरीक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संत ज्ञानेश्वरांच्या कृपेने त्यांना सद्बुद्धी लाभावी आणि त्यांनी संतपरंपरा व श्री विठ्ठलाची क्षमा मागावी, अशीही मागणी संस्थान कमिटीने केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे धार्मिक आणि सामाजिक स्तरावर चर्चांना उधाण आले असून पुढील काळात या विषयावर अधिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *