घोरावाडी रेल्वे स्थानकावर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन
घोरावाडी रेल्वे स्थानकावर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संघाच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि. २४) सकाळी ९ वाजता घोरावाडी रेल्वे स्थानकावर लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघाचे अध्यक्ष पोपटराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सभासद लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या आंदोलनातून प्रवाशांच्या दैनंदिन अडचणींना वाचा फोडण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.
संघाने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये दुपारी १२ ते ३.३० या वेळेत उपनगरीय (लोकल) गाड्यांची सेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे मध्यान्ह काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचे सांगितले जाते. तसेच कोल्हापूरहून पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा मुंबईपर्यंत पूर्ववत सुरू करावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय बारामती ते कर्जत दरम्यानची पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करणे, रात्री ११.१५ वाजता शिवाजीनगर ते तळेगाव लोकल सेवा पूर्ववत करणे, तसेच पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव स्थानकावर दोन्ही मार्गांवर थांबा देणे या मागण्यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी इंद्रायणी एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा देण्याची मागणीही संघाने लावून धरली आहे.
घोरावाडी रेल्वे स्थानकाची दुरवस्था सुधारून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी यावेळी पुढे करण्यात आली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार स्थानकाचा विकास करणे ही काळाची गरज असल्याचे संघाचे मत आहे.
दरम्यान, या आंदोलनात जास्तीत जास्त प्रवाशांनी सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आले आहे. आंदोलनामुळे प्रशासनाला जाग येऊन प्रवाशांच्या समस्या मार्गी लागतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





