सामाजिक

तळेगावात आगींची मालिका; अग्निशामक दलाच्या धाडसाला सलाम, कर्मचाऱ्यांचा गौरव


तळेगावात आगींची मालिका; अग्निशामक दलाच्या धाडसाला सलाम, कर्मचाऱ्यांचा गौरव

तळेगाव दाभाडे : वाढत्या उन्हाच्या झळा आणि काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे तळेगाव दाभाडे शहरात एका दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी कामगिरीमुळे सर्व ठिकाणी मोठा अनर्थ टळला.

पहिली घटना शहरातील एका बंद घरात घडली. घर बंद असल्यामुळे आग वेगाने पसरत होती आणि परिस्थिती गंभीर बनत होती. माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जीवाची पर्वा न करता त्यांनी आत शिरत आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रसंगात मोठ्या धाडसाचे दर्शन घडले.

दरम्यान, शहरातील अन्य दोन ठिकाणी वाळलेल्या गवताला लागलेल्या आगी काही क्षणांत पसरू लागल्या होत्या. उष्णतेमुळे आग अधिक भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशामक कर्मचाऱ्यांनी वेळीच पोहोचत या आगी काही मिनिटांतच आटोक्यात आणल्या. त्यामुळे परिसरातील घरे व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान टळले.

तिसरी आणि सर्वात गंभीर घटना तळेगाव-चाकण महामार्गावर घडली. भारत पेट्रोलियमजवळ उभ्या असलेल्या डिझेल टँकरला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. टँकरमध्ये इंधन असल्यामुळे स्फोटाचा मोठा धोका निर्माण झाला होता. परिस्थिती अत्यंत संवेदनशील होती. मात्र, अग्निशामक दलाने प्रसंगावधान राखत आणि जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करत ही भीषण आग विझवली. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे मोठा अपघात टळला आणि नागरिकांचे तसेच पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान वाचले.

या सर्व घटनांमध्ये अग्निशामक दलाने दाखवलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा उल्लेखनीय ठरली. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून अग्निशामक दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अग्निशमन अधिकारी संतोष तेलगे तसेच कर्मचारी निरंजन भेगडे, अनुपम सिंग, शुभम काळोखे, अक्षय घोडेकर, ओम भेगडे, आकाश ओव्हाळ, शेखर खोमणे, भास्कर माळी आणि बाळू ठाकर यांचा नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि नगरसेवकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सन्मान सोहळ्यात नगरसेवक सत्यम खांडगे, शिवाजी आगळे, सिद्धार्थ दाभाडे, चिराग खांडगे, निखिल भगत, बाबा मुलानी, सूरज सातकर, हेमलता खळदे, शोभा परदेशी, डॉ. ऋतुजा भगत, संगीता खळदे, शैलजा काळोखे, अश्विनी शेळके, मनीषा म्हाळसकर आणि स्नेहा खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांनी अग्निशामक दलाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. अशा संकटाच्या वेळी दाखवलेले धाडस, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे, असे ते म्हणाले.

तसेच, नागरिकांनीही आग लागण्याच्या घटनांकडे गांभीर्याने पाहत निष्काळजीपणा टाळावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. अग्निशामक दलाच्या धाडसी कार्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या सेवाभावाचा प्रत्यय आला असून शहरवासीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *