उद्योग

लोणावळ्यात बुलेट राजां चा माज उतरवला. फटाके फोडणाऱ्या गाड्यांवर पोलिसांची कडक कारवाई


लोणावळ्यात बुलेट राजां चा माज उतरवला. फटाके फोडणाऱ्या गाड्यांवर पोलिसांची कडक कारवाई

लोणावळा :
शहरात वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी बुलेट राजां च्या फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरविरोधात कडक पावले उचलली आहेत. नियमबाह्य व प्रचंड आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींवर थेट कारवाई करत पोलिसांनी सायलेन्सर जप्त केले. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान पोलिसांनी स्वतः हातात पाना-पक्कड घेऊन जागेवरच सायलेन्सर काढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहर व पर्यटन परिसरात बुलेट मोटारसायकलींवरील मॉडिफाईड सायलेन्सरमुळे मोठ्या आवाजाचा त्रास वाढला होता. रात्री-अपरात्री होणाऱ्या फटाक्यांसारख्या आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच पर्यटक त्रस्त झाले होते. याबाबत शहर वाहतूक पोलिसांकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहिम राबवत शहरातील प्रमुख चौक, पर्यटन मार्ग व वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली.

या तपासणीदरम्यान नियमबाह्य सायलेन्सर लावलेल्या अनेक बुलेट गाड्या आढळून आल्या. केवळ दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी थेट सायलेन्सर काढून जप्त केल्याने वाहनचालकांची चांगलीच चपराक बसली. रस्ते कुणाच्या माजासाठी नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला.

वाहतूक पोलिसांच्या या ठोस भूमिकेमुळे शहरात काही काळातच शांतता अनुभवायला मिळाली. ध्वनीप्रदूषणात घट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे लोणावळा शहरातील नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांनी स्वागत केले असून, अशीच कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.

लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, भविष्यातही नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्याचा धाक दाखवत शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *