सामाजिक

कामशेत मधे विशेष मतदार नोंदणी अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कामशेत मधे विशेष मतदार नोंदणी अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कामशेत : १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कामशेत येथे आयोजित विशेष मतदार नोंदणी अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि अधिकाधिक पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

हे अभियान गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कामशेत येथील श्री गणेश मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते. दिवसभरात मोठ्या संख्येने युवक-युवतींनी उपस्थित राहून मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकृती, कागदपत्रांची पडताळणी तसेच आवश्यक मार्गदर्शनाची स्वतंत्र व्यवस्था केली होती.

अभियानादरम्यान प्रथमच मतदानाचा हक्क मिळवणाऱ्या तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करणे अत्यावश्यक आहे,असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

या उपक्रमास कामशेत ग्रामीण पत्रकार संघ यांचेही सहकार्य लाभले. संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे तसेच दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

अभियानात सुमारे दोनशे अर्ज भरून घेण्यात आले. युवक-युवतींसह नागरिकांनीही या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पडल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अशा प्रकारची विशेष अभियान राबविणे काळाची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *