महत्त्वाचे

लाईटच्या खांबांमुळे तळेगाव दाभाडेत अपघातांचा धोका वाढला


लाईटच्या खांबांमुळे तळेगाव दाभाडेत अपघातांचा धोका वाढला

तळेगाव दाभाडे :
शहरातील लिंब फाटा ते मारुती मंदिर (तुकाराम नगर, मुळे हॉस्पिटल परिसर) या मार्गावरील रस्तारुंदीकरणाचे काम नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आले असले, तरी अर्धवट नियोजनामुळे हेच काम आता अपघातांना आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. फुटपाथ हटवून रस्ता रुंद करण्यात आला असला, तरी रस्त्याच्या मधे उभे असलेले लाईटचे खांब अद्याप हलवण्यात आलेले नाहीत. परिणामी वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

रस्तारुंदीकरणानंतर सर्व विद्युत खांब रस्त्याच्या कडेला, एका सरळ रेषेत हलवणे आवश्यक असते. मात्र येथे घाईघाईत व नियोजनाअभावी काम केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी किंवा वाहतूक जास्त असताना हे खांब वाहनचालकांच्या नजरेत न आल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढतो आहे.

आज सकाळी याच मार्गावर एका लाईटच्या खांबाला टेम्पोची धडक बसल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा अपघात प्रशासनासाठी गंभीर इशारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याआधीही या परिसरात किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

भविष्यात एखादा गंभीर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सर्व लाईटचे खांब रस्त्याच्या एका बाजूस हलवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विनायक पुजारी म्हणाले, कि तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा ते मारुती मंदिर रस्त्याचे काम अत्यंत निष्काळजीपणे करण्यात आले आहे. रस्ता रुंद केला, पण लाईटचे खांब तसेच ठेवले, ही गंभीर चूक आहे. हे खांब थेट अपघातांना आमंत्रण देत आहेत. आज टेम्पोला झालेली धडक ही प्रशासनाच्या दुर्लक्षाची परिणती आहे. भविष्यात मोठा अपघात घडल्यास त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी प्रशासनालाच स्वीकारावी लागेल. नागरिकांच्या जीवाशी खेळ न करता तातडीने सर्व खांब एका बाजूस हलवावेत, ही आमची ठाम मागणी आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *