उद्योग

रहिवासी भागात बहुउद्देशीय सभागृह की व्यावसायिक कार्यक्रमांचा अड्डा:कडोलकर कॉलनीतील राम-मनोहर लोहिया हॉलच्या वापरावर नागरिकांचा सवाल; वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, नगरपरिषद व पोलिस प्रशासनाला जाब


रहिवासी भागात बहुउद्देशीय सभागृह की व्यावसायिक कार्यक्रमांचा अड्डा:कडोलकर कॉलनीतील राम-मनोहर लोहिया हॉलच्या वापरावर नागरिकांचा सवाल; वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, नगरपरिषद व पोलिस प्रशासनाला जाब

तळेगाव दाभाडे : कडोलकर कॉलनी हा मुख्यतः रहिवासी परिसर असून या ठिकाणी मोठ्या संख्येने वृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, याच परिसरातील डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठ अर्थात राम-मनोहर लोहिया हॉलमध्ये विविध खासगी कार्यक्रम, विवाह समारंभ, वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने निर्माण होणाऱ्या आवाजामुळे रहिवाशांच्या शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः सततच्या मोठ्या आवाजामुळे वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

लेन क्रमांक १, खांडगे पेट्रोल पंपाच्या मागे, अंबिका अपेक्ससमोर असलेल्या या इमारतीत कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ होते. वाहने रस्त्यावर उभी केली जातात, तर वाद्यवृंद व ध्वनिक्षेपकांमुळे परिसरातील शांतता भंग होते. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांनी नेमके कुठे जावे? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक वाचनालय व सामाजिक उपक्रमांसाठी असलेल्या या इमारतीचा प्रत्यक्ष वापर व्यावसायिक पद्धतीने होत असल्यास त्यामागील परवानग्या कोणत्या, याचा खुलासा तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने करणे आवश्यक आहे. रहिवासी क्षेत्रातील इमारतीचा व्यावसायिक वापर करण्यास कोणत्या नियमांतर्गत परवानगी देण्यात आली, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ध्वनिक्षेपक व वाद्यांच्या आवाजामुळे वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना नगरपरिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे? नियमभंग होत असल्यास कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.कडोलकर कॉलनी प्रभागातील आजी माजी नगरसेवक यांनी देखील या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

या इमारतीच्या बांधकामापासून सध्याच्या वापरापर्यंत सर्व बाबींची सखोल चौकशी करून रहिवाशांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *