सामाजिक

नशामुक्त पिंपरी-चिंचवडचा संकल्प:पण ड्रग्ज तस्करांवर मकोकाची कारवाई किती?मुख्यमंत्र्यांच्या नशामुक्तीच्या घोषणांचे स्वागत:प्रत्यक्ष कारवाईचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची मागणी


नशामुक्त पिंपरी-चिंचवडचा संकल्प:पण ड्रग्ज तस्करांवर मकोकाची कारवाई किती?मुख्यमंत्र्यांच्या नशामुक्तीच्या घोषणांचे स्वागत:प्रत्यक्ष कारवाईचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची मागणी

 

 

 

पिंपरी-चिंचवड : तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नशामुक्त पिंपरी-चिंचवडचा संकल्प करण्यात आला असला, तरी या संकल्पाची खरी कसोटी आता प्रत्यक्ष पोलीस कारवाईतून लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज माफिया आणि व्यावसायिक तस्करांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली. मात्र, घोषणांनंतर ड्रग्ज तस्करांच्या साम्राज्यावर नेमका किती घाव घातला, किती जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई झाली, याचा हिशेब जनतेसमोर येणे आवश्यक आहे.

 

अमली पदार्थांचे जाळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उद्ध्वस्त होणार नाही. या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक पाठबळ देणारे चेहरे आणि संपूर्ण पुरवठा साखळी यांच्यावर कायद्याचा कठोर बडगा उगारण्याची गरज आहे. ड्रग्जच्या उत्पादनातून आणि विक्रीतून उभारलेली बेकायदेशीर संपत्ती जप्त करणे, आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे तसेच कुरिअर सेवांचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, अशा उपाययोजनांची घोषणा करण्यात आली होती.

 

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील संशयास्पद टपऱ्या, दुकाने आणि अनधिकृत बांधकामे हटवून शैक्षणिक परिसर नशामुक्त करण्याची भूमिका सरकारने मांडली. मात्र, या मोहिमेचा परिणाम प्रत्यक्ष किती दिसतो, याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.

 

दरम्यान, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामूहिक नशामुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

या पार्श्वभूमीवर राज्यात आणि विशेषतः पिंपरी-चिंचवडमध्ये किती ड्रग्ज तस्करांवर मकोका लावला, किती आरोपींना अटक केली आणि किती कोटींची मालमत्ता जप्त केली, याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी. कारण नशामुक्तीची शपथ घेणे महत्त्वाचे असले, तरी ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडणे त्याहून महत्त्वाचे आहे. तरुणाईचे भविष्य वाचविण्याचा संकल्प घोषणांपुरता मर्यादित न राहता तो पोलीस कारवाईतून सिद्ध झाला, तरच नशामुक्त पिंपरी-चिंचवडचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *