पत्रकारितेचा बुरखा, माहिती अधिकाराचा धाक; कथित खंडणीखोर शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यात पोलिसांच्या जाळ्यात!
पत्रकारितेचा बुरखा, माहिती अधिकाराचा धाक; कथित खंडणीखोर शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यात पोलिसांच्या जाळ्यात!
लोणावळा : स्वतःला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकाराचा (RTI) अभ्यासक म्हणून समाजासमोर मिरवत नागरिकांना कथित फसवणूक आणि खंडणीच्या जाळ्यात ओढणाऱ्या शैलेंद्र द्विवेदी याच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी फरार असलेल्या द्विवेदीला लोणावळ्यात सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये द्विवेदी याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अलीकडेच फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचा अंदाज येताच त्याने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत लोणावळ्यात शोधमोहीम राबवली आणि अखेर त्याला अटक केली.
पोलिस तपासात समोर आलेली माहिती अधिक गंभीर आहे. पत्रकार असल्याचे भासवणे, माहिती अधिकाराच्या कागदपत्रांचा धाक दाखवणे आणि विविध कारणांनी नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून कथित खंडणी उकळणे, असा त्याचा कारभार असल्याचा संशय तपासातून व्यक्त होत आहे. या मार्गाने त्याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये वसूल केल्याची माहिती पुढे आली आहे.
इतकेच नव्हे, तर या कथित अवैध कमाईतून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचे जाळे कार्यरत आहे का, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या कारवाईची माहिती दिली.
पत्रकारितेचा मुखवटा वापरून गैरप्रकार करणाऱ्यांमुळे प्रामाणिक पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.





