सांगलीत एक महाराष्ट्र केसरी एकच गदा चा हुंकार. चार-चार स्पर्धांवर मल्लांचा एल्गार
सांगलीत एक महाराष्ट्र केसरी एकच गदा चा हुंकार. चार-चार स्पर्धांवर मल्लांचा एल्गार
सांगली : तब्बल ६५ वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाभोवती निर्माण झालेल्या वादळाने आता एल्गाराचे रूप धारण केले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत स्पर्धेच्या ‘बहुरूपीकरणा’मुळे किताबाची पत धोक्यात आल्याचा आरोप करत राज्यातील ३० महाराष्ट्र केसरी आणि दहा हिंदकेसरी विजेत्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. एकच स्पर्धा घ्या अन्यथा मानाच्या गदा परत करून आझाद मैदान येथे उपोषणाला बसू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सांगलीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हिंदकेसरी दीनानाथसिंह, हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक महाराष्ट्र केसरु एकच गदा चा नारा दिला. १९६१ पासून कुस्ती परिषदेच्या माध्यमातून सुरू झालेली ही स्पर्धा गेल्या काही वर्षांत आर्थिक शक्तीच्या ‘समांतर पटांगणां’वर खेळली जाऊ लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परिणामी, गेली दोन वर्षे दोन-दोन स्पर्धा भरल्या; आणि आता तर चार स्वतंत्र स्पर्धांची घोषणा होत असल्याने संभ्रमाचे ढग दाटले आहेत.
खरा महाराष्ट्र केसरी कोण? हा प्रश्नच अनुत्तरित राहिल्याचे दीनानाथसिंह म्हणाले. विजेत्यांना शासनाकडून पेन्शन व शासकीय सुविधा मिळतात; मात्र स्पर्धाच अनेक झाल्याने मानधनापासूनही काही जण वंचित राहत असल्याची खंत त्यांनी मांडली. “६५ वर्षांच्या परंपरेला तीन-चार वर्षांचे गालबोट आम्ही सहन करणार नाही. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांनी तातडीने तोडगा काढावा,अशी मागणी मल्लांनी केली.
स्पर्धेपूर्वीच शासनाने एकत्रित निर्णय घ्यावा, अन्यथा ३० महाराष्ट्र केसरी आणि दहा हिंदकेसरी विजेते आझाद मैदानावर उपोषणास बसतील, असा ठाम इशाराही देण्यात आला. आमची बाजू मांडणारा आवाज विधानपरिषदेवर हवा. चंद्रहार पाटील यांना संधी द्यावी; ते आमच्यासाठी लढतील,अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ‘कोटींची गदा’ उगारत मोठी घोषणा केली. सर्व संघटनांनी एकमत करून शासनाच्या परवानगीने यंदाची एकमेव स्पर्धा सांगलीत घेतल्यास विजेत्याला आम्ही एक कोटी रुपये देऊ. पुढील वर्षी ज्याची एक कोटी देण्याची तयारी असेल, त्याने स्पर्धा घ्यावी,असे ते म्हणाले. महाराष्ट्र केसरी होण्यासाठी मल्ल आयुष्याची १५ ते २० वर्षे अक्षरशः रक्ताचे पाणी करतो; ५० ते ६० लाखांचा खर्च या प्रवासात होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या पत्रकार परिषदेस विजय पाटील, लक्ष्मण मंडले, दादा धडस, विनोद देसाई यांच्यासह अनेक मल्ल उपस्थित होते. परंपरेचा मान, गदेचा सन्मान आणि किताबाची एकसूत्रता जपण्यासाठी मल्लांनी आता एकीचा फड उभारला आहे. शासनाने तातडीने मध्यस्थी करत कुस्तीच्या या राजमुद्रेवरील वादाला पूर्णविराम द्यावा, अशीच अपेक्षा क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.





