डोळसनाथ महाराज उत्सवात बैलगाड्यांचा वेगवान जल्लोष
डोळसनाथ महाराज उत्सवात बैलगाड्यांचा वेगवान जल्लोष
तळेगाव दाभाडे : श्री डोळसनाथ महाराज उत्सवानिमित्त तळेगाव दाभाडे येथे भरलेल्या भव्य बैलगाडा शर्यतींनी यंदा वेग, स्पर्धा आणि जल्लोषाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील गाडामालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा थरार अधिकच रंगतदार ठरला. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून शर्यतीचा आनंद लुटत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
उत्सवाच्या निमित्ताने आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत असून, बैलगाडा शर्यत हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पहिल्या दिवशी सकाळपासून सुरू झालेल्या शर्यती सायंकाळपर्यंत रंगल्या. दोन्ही दिवस मिळून सुमारे ३०० बैलगाड्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची पातळी उंचावली.
विशेष म्हणजे अनेक स्पर्धकांनी १३ सेकंदांपेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करत प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम दिवशीही चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. बैलांच्या वेगवान झेपांमुळे मैदानात एकच जल्लोष उसळला होता.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून त्यात दुचाकी, वॉशिंग मशीन, फ्रिज, कुलर तसेच रोख रकमेचा समावेश आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चुरस अधिकच वाढली होती.
निकाल पुढीलप्रमाणे :
पहिला दिवस :
१. दशरथ भगवान गराडे – गणेश दादा गराडे (१२.२२ सेकंद)
२. प्रसाद भगवान चौधरी – राजेंद्र शंकर भोंडवे (१२.३०)
३. साईनाथ नंदकुमार कुटे – आबाजी होनाजी हिले (१२.३३)
४. गणपत मारुती ठोंबरे – रोहिदास कुटे (१२.५१)
५. प्रथमेश अण्णासाहेब पारखी – मल्हार मोरे (१२.५६)
दुसरा दिवस :
१. ज्ञानेश्वर दहातोंडे – संजय निघोट व गोविंद शंकर ढोरे – अमर गवळी (प्रत्येकी १२.१०, विभागून)
२. नवनाथ चंद्रकांत सुतार – यश पप्पू दाभणे (१२.११)
३. जालिंदर विठोबा बराटे – नामदेव बिरवडे (१२.१३)
४. अद्वैत दादा मस्के – साहिल मोढवे (१२.१७)
५. आदिराज लहू दादा कदम – बाळासाहेब राघोजी ठाकूर (१२.२३)
तळेगाव दाभाडे गावकी :
१. विलास काळोखे (११.२१)
२. सोमाभाऊ भेगडे (११.४६)
या शर्यतीमुळे पारंपरिक बैलगाडा संस्कृतीचे जतन होत असून ग्रामीण क्रीडा परंपरेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र तळेगावात पाहायला मिळाले.





