महाराष्ट्रसामाजिक

शौर्यची माती आणि असुरक्षित लेकी. मावळच्या अंतकरणाला पडलेले प्रश्नचिन्ह


शौर्यची माती आणि असुरक्षित लेकी. मावळच्या अंतकरणाला पडलेले प्रश्नचिन्ह

शौर्य, त्याग आणि अध्यात्म यांचे संस्कार ज्या मातीच्या कणाकणात मिसळले आहेत, त्या मावळ तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतात, ही बाब केवळ लाजिरवाणी नाही, तर काळजाचा ठाव घेणारी आहे. ही मावळच्या मातीवर पडलेली काळी रेघ आहे. हे प्रकार केवळ कायद्याच्या भाषेत गुन्हे नाहीत, तर समाजाच्या मुकाट मौनावर आणि व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेले रक्तबंबाळ बोटांचे ठसे आहेत. शूरवीरांचा इतिहास मिरवणाऱ्या या भूमीत महिलांना आणि बालिकांना भीती वाटावी, हीच खरी शोकांतिका आहे.

मावळचा इतिहास कधीही गप्प राहणाऱ्यांचा नव्हता. अन्याय दिसला की तलवार म्यानात ठेवण्याची परंपरा येथे नव्हती. मराठा साम्राज्याच्या प्रथम महिला सर सेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकारांनी समशेर उचलली, कारण अन्याय सहन करणे हे त्यांच्या रक्तातच नव्हते. आज हातात समशेर नको, पण छातीत तीच धग हवी. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, डोळ्यात डोळे घालून सवाल करण्याची ज्वाला पुन्हा पेटवण्याची हीच वेळ आहे. अत्याचार झाल्यावर रडणारा समाज नव्हे, तर अत्याचार घडण्याआधीच सावध होणारा समाज घडला पाहिजे.

आज मावळची स्त्री ‘चूल आणि मूल’च्या साखळ्या तोडून बाहेर पडली आहे. शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, समाजकारण अशा अनेक रणांगणांवर ती आपली छाप सोडत आहे. पण ही ताकद जर फक्त कार्यक्रमांच्या माईकपुरती, मंचावरच्या टाळ्यांपुरती आणि सन्मानाच्या शालीपुरती मर्यादित राहिली, तर ती शक्ती नव्हे तर केवळ देखावा ठरेल. स्त्रीशक्तीचा खरा कस हा संकटाच्या वेळी लागतो. आपली लेक आज सुरक्षित आहे का? हा प्रश्न प्रत्येक आईच्या काळजात सल म्हणून टोचला पाहिजे.

मावळ तालुक्यातील विविध कार्यक्रम, ‘होम मिनिस्टर’सारखे उपक्रम हजारो महिलांना एकत्र आणतात. या गर्दीत हास्य असते, मोकळेपणा असतो, क्षणिक विसावा असतो. पण याच गर्दीत जर लेकींच्या सुरक्षिततेचा निनाद झाला, तर ही गर्दी केवळ प्रेक्षक न राहता रणरागिणी बनेल. प्रश्न फक्त आवाज उठवण्याचा आहे, एकजुटीने उभे राहण्याचा आहे.

अन्याय आणि अत्याचार हद्दपार करण्यासाठी आज तलवार नव्हे, तर जागृतीचे शिवधनुष्य उचलावे लागेल. मात्र हे शिवधनुष्य महिलांच्या हाती देण्याची जबाबदारी प्रशासनाने झटकून चालणार नाही. पोलीस केवळ गुन्हा दाखल करून मोकळे झाले, तर न्याय अर्धवटच राहील. कायदा महिलांना समजला, तर तो त्यांच्या हातातील शस्त्र बनेल; अन्यथा तो कपाटात बंद पडलेला कागद ठरेल.

गावोगावी महिला सुरक्षितता दक्षता समित्या नावापुरत्या नव्हे, तर धडधडत्या श्वासांसह कार्यरत व्हायला हव्यात. प्रत्येक महिलेचा त्यात सहभाग असायलाच हवा. पोलीस, प्रशासन आणि समाज या तिन्हींची वज्रमुठ घट्ट बांधली गेली, तरच मावळ पुन्हा आपल्या शौर्याला, प्रतिष्ठेला आणि सुरक्षिततेला न्याय देऊ शकेल.

मावळची ओळख अत्याचारांच्या मथळ्यांनी नव्हे, तर अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभी ठाकणाऱ्या स्त्रीशक्तीने व्हायला हवी. कारण इतिहास शांत बसणाऱ्यांना नाही, तर अन्यायाशी लढणाऱ्यांनाच आठवतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *